Join us
Daily Top 2Weekly Top 5

​तू सूरज मैं सांझ पियाजीमध्ये फरीदा जलाल यांची लवकरच होणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 13:24 IST

स्टार प्लसवरील दिया और बाती हम ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेची कथा, सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या ...

स्टार प्लसवरील दिया और बाती हम ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेची कथा, सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. दिया और बाती हम या मालिकेच्या यशानंतर या मालिकेचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या मालिकेला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. तू सूरज मैं सांझ पियाजी या मालिकेने आपल्या कथानकामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेमध्ये दिया और बाती हम या मालिकेतील काही दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत असून रिहा शर्मा आणि अविनाश रेखी हे दोन चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. रिहा आणि अविनाशच्या केमिस्ट्रीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
तू सूरज मैं सांझ पियाजी या मालिकेत सध्या सुरू असलेल्या ट्रॅकनुसार कनक आणि उमा यांच्यामधील घटस्फोटामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. पण या मालिकेत कनक आणि उमा यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी या मालिकेचे निर्माते अतिशय वेगळा आणि खास मार्ग अवलंबणार असल्याचे कळतेय. या मालिकेत आता एका नव्या व्यक्तिरेखेची एंट्री होणार असून ही व्यक्ती या दोघांमध्ये समेट घडवून आणणार आहे. ही व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल साकारणार आहेत. फरिदा जलाल या मालिकेद्वारे कित्येक महिन्यानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहेत. 
सध्या तू सूरज मैं सांझ पियाजी या मालिकेत उमाची मावशी या दोघांना वेगळे करण्याच्या प्रयत्नात आहे. पण फरीदा जलाल उमा आणि कनक यांच्यात समेट घडवून आणताना दिसणार आहेत. फरीदा यांची या मालिकेतील भूमिका ही काहीच भागांची आहे. फरीदा यांची ही भूमिका छोटी असली तरी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे. वेद आणि पायल यांच्या लग्नाचा ट्रॅक हा तू सूरज मैं सांझ पियाजी या मालिकेतील टर्निंग पॉईन्ट असणार असून त्यानंतर मालिकेत अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.
फरिदा जलाल यांनी आजवर शरारत, बालिका वधू, देख भाई देख, ये जो है जिंदगी, अम्माजी की गली, जीनी और जूजू, सतरंगी ससुराल यांसारख्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.  

Also Read : तू सुरज मैं सांज पियाजी फेम मधुरा नाईकचा हॉट अवतार