Join us

तू माझा सांगाती या मालिकेत भरत जाधव साकारणार विठ्ठलाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 11:24 IST

तू माझा सांगाती या मालिकेचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या पर्वात तुकारामाच्या मुखी विठ्ठल रखुमाबाईची ...

तू माझा सांगाती या मालिकेचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या पर्वात तुकारामाच्या मुखी विठ्ठल रखुमाबाईची संसारगाथा प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे आणि या मालिकेत विठ्ठलाची भूमिका मराठीतील प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव साकारणार आहे. भरतसोबत या मालिकेत मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक प्रसिद्ध चेहरा झळकणार आहे. अभिनेत्री स्मिता शेवाळे या मालिकेत रखुमाबाईची भूमिका साकारणार आहे. या दोघांनी या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवातदेखील केली आहे. या मालिकेतील भरत आणि स्मिताचा लूक खूप वेगळा आहे. भरत जाधवने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हसा चकटफू, प्रपंच यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. दरम्यानच्या काळात चित्रपट आणि नाटकांमध्ये व्यग्र असल्याने त्याला छोट्या पडद्यावर काम करायला वेळ मिळत नव्हता. तरीही त्याने आली लहर केला कहर या कार्यक्रमात काम केले होते. आता तो एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. भरत आजवर कधीच कोणत्या पौराणिक मालिकेत झळकला नव्हता. तू माझा सांगाती ही त्याची पहिलीच पौराणिक मालिका असून या मालिकेत काम करण्यास तो खूप उत्सुक असल्याचे कळतेय आणि विशेष म्हणजे तो कृष्णाचा भक्त असल्याने त्याला या मालिकेत भूमिका साकारायला मिळत असल्याने तो खूपच खूश आहे.स्मिता शेवाळे आणि भरत जाधव यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पहिल्यांदाच ही जोडी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हे विठ्ठल रखुमाबाई खूप आवडतील अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे.