Join us
Daily Top 2Weekly Top 5

​विकता का उत्तर या कार्यक्रमामुळे मिळाला स्पर्धकाला चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 16:50 IST

विकता का उत्तर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील रितेश देशमुखचे सूत्रसंचालन लोकांना चांगलेच भावत आहे. ...

विकता का उत्तर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील रितेश देशमुखचे सूत्रसंचालन लोकांना चांगलेच भावत आहे. कार्यक्रमात येणारे स्पर्धक विकता का उत्तरचा खेळ खेळण्यासोबतच या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक रितेश देशमुखसोबत मजामस्तीदेखील करतात. या कार्यक्रमात नुकत्याच आलेल्या एका स्पर्धकाचे या कार्यक्रमामुळे संपूर्ण जीवनच बदलले.विकता का उत्तर या कार्यक्रमात नुकताच एका भागात परेश गवळी म्हणून एक स्पर्धक आला होता. परेशने या कार्यक्रमात विविध अभिनेत्यांची मिमिक्री करून दाखवली. त्याची मिमिक्री सगळ्यांनाच खूप आवडली. त्याच्या मिमिक्रीमुळे रितेश देशमुख आणि उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच हसून हसून पूर्ण वाट लागली. परेशनच्या मिमिक्रीमुळे रितेश तर खूपच खूश झाला होता. त्याने परेशचे कौतुक तर केले पण त्याचसोबत त्याला चार्ली चॅप्लिन यांचा एक फोटो दिला. रितेश आजच्या घडीला बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता मानला जातो. त्याने आपल्या मिमिक्रीचे कौतुक करणे हे परेशसाठी खूप महत्त्वाचे होते. रितेशचे कौतुकाचे शब्द ऐकताच तो खूप भावनिक झाला. त्याला त्याचे अश्रु आवरत नव्हते. परेश सांगतो, "अभिनयक्षेत्रात करियर करण्याची माझी नेहमीच इच्छा होती. मात्र योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते शक्य झाले नाही. पण आज मला माझ्यातील अभिनयकौशल्य येथे सादर करता आले याचा मला आनंद आहे. रितेश आणि परेश या दोघांमध्ये हा संवाद सुरू असतानाच विकता का उत्तर या कार्यक्रमाचे लेखक हृषिकेष जोशी सगळे ऐकत होते. त्यांना परेशचा अभिनय अतिशय आवडल्याने त्यांनी आपल्या आगामी चित्रपटातील एका भूमिकेसाठी परेशची निवड केली. त्याबाबतची घोषणादेखील कार्यक्रमात करण्यात आली. त्यामुळे परेशचा आनंद द्विगुणित झाला. या घटनेमुळे विकता का उत्तर या कार्यक्रमामुळे एका स्पर्धकाचे स्वप्न पूर्ण झाले."