Join us

'वादळवाट' फेम अभिनेत्याची गंभीर आजाराशी झुंज, मित्राची भावूक पोस्ट; आर्थिक मदतीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 12:08 IST

मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते डॉ विलास उजवणे यांना ब्रेक स्ट्रोकच्या आजाराने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेली सहा वर्षे ते ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत आहेत.

मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते डॉ विलास उजवणे यांना ब्रेक स्ट्रोकच्या आजाराने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेली सहा वर्षे ते ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत आहेत. इतकंच नाही तर आता त्यांना हृदयाचा त्रास आणि कावीळही झाली आहे. ऑपरेशनसाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज असून त्यांचे मित्र राजू कुलकर्णी यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करत मदतीचे आवाहन केले आहे.

राजू कुलकर्णी यांनी केली भावूक पोस्ट 

फेसबुकवर पोस्ट करत राजू कुलकर्णी यांनी आर्थिक मदतीचे आव्हान केले आहे. सोबत अभिनेते भरत जाधव आणि केदार शिंदे यांनाही टॅग केले  आहे. त्यांनी लिहिले आहे,

एक मनस्वी आवाहन...माझ्या जेष्ठ मित्रासाठी.!

एखाद्या कलाकाराचे खाजगी आयुष्य म्हंटले की अनेक लोकांचे, प्रेक्षकांचे वेगवेगळे विचार, वेगळ्या कल्पना वगैरे असतात आणि त्यात काहीही गैर नाही...त्यात कलाकार लोकप्रिय असेल तर विचारूच नका...त्यामागे आकर्षण, त्याचा अभिनय, व्यक्तिमत्व असे असावे...ते लाईमलाईट मध्ये सतत असल्याने असे वाटणे स्वाभाविक आहे. या झगमगाटामधील दुनियेप्रमाणे ते व्यक्तिगत आयुष्यातही असेच वावरत असावेत असाही एक समज असतो, आहे! त्याच्या खाण्या पिण्याच्या आवडीनिवडी पासून तो कुठे राहतो, कुठली गाडी वापरतो, कसल्या प्रकारचे कपडे इथपासून ते अनेक गोष्टीत रस असतो.

पण असा हा कलाकार (काही अपवाद वगळता) इतरांप्रमाणेच मेहनत करून वर येत असतो, आला असतो... ह्यालाही आपल्यासारखेच संसार, अडचणी, प्रकृतीच्या तक्रारीं , विवंचना याला सामोरे जावे लागते...पण ही दुनिया अशी आहे की यांची दुःख, अडचणी लोकांना कधीच समजत नाही आणि ते देखील आपल्या फॅन्सला कळू देत नाही .... सतत हसतमुखाने त्यांच्यासमोर येतात...याचे कारण म्हणजे लोकांनी मनात साठवलेली त्यांची पडद्यावरची इमेज!.

......तर अशाच एका हरहुन्नरी, गोड स्वभावाचा, दिलखुलास कलाकार असलेल्या माणसाबद्दल मी थोडे बोलणार आहे मित्रानो !

त्यांचे नाव डॉ. विलास उजवणे....या राजा माणसाची अन् माझी ओळख २००४ पासूनची. एका नाटकात आम्ही काम करत होतो....तालमीच्या दिवसा पासूनच आमची मैत्री जमली....आणि प्रत्येक प्रयोगात, अनेक दौऱ्यात ती खूप घट्ट होत गेली...नाटक थांबले की सगळे परके होतात हा माझा अनुभव.

पण आज अठरा वर्षे उलटून गेली तरी आमचे स्नेहबंध आजही तसेच आहेत .

मित्रांनो, आज एक गोष्ट सांगताना मला फार वाईट वाटत आहे की हा राजा माणूस म्हणजे आमचा लाडका डॉक्टर मोठ्या अडचणीत सापडला आहे...गेली सहा वर्षे ब्रेन स्ट्रोकशी झुंज देणाऱ्या हा वाघ थोडा थकला आहे.

अत्यंत साध्या सदनिकेत राहणारा हा कलाकार आपल्या आयुष्याची सर्व पुंजी या आजारांमध्ये खर्च करून बसला आहे आणि ती रक्कम थोडी थोडकी नाही.....चांगली सुधारणा होत आहे असे वाटत होते, बाहेर पडत होते, कुठे परीक्षक तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून त्याच्या चाहत्यांना दिलासा देत होते...लवकरच हे आपली सेकंड इनिंग चालू करणार असे वाटत असताना नियती त्यांच्या पुढे दोन मोठ्या आजारांचे निष्ठुर दान टाकून निघून गेली.

ह्रदयविकाराचा त्रास झाला असून त्याचे मोठे ऑपरेशन तातडीने करणे अत्यावश्यक आहे....त्यात भरीला एक वेगळ्या काविळीची भर पडली आहे...ही कावीळ लाखोकरोडो लोकांमधे एखाद्यास होते त्यामुळे त्यांच्या शरीरातील इतर ऑर्गनस वर वाईट परिणाम करत आहे.....

ह्या कारनामुळे छोटी इस्पितळे त्यांना दाखल करत नाही....कोल्हापूरच्या इस्पितळात होते... पण परत यावे लागले...आता एकच उपाय मुंबई मधील मोठे हॉस्पिटल ! तिथेच हे शक्य आहे....त्यामुळे खुपसा खर्च डोळ्यासमोर आ वासून उभा आहे.

डॉक्टरजवळ असलेली गंगाजळी फारच त्रोटक आहे त्यात जवळ असलेल्या मेडिक्लेम व इतर पॉलिसी देखील संपुष्टात आल्या आहेत.

गेली सहा वर्षे आजारात आणि जवळ काम नाही त्यात हे नवीन आजार. तेव्हा ह्या चक्रव्युहातून या अभिमन्यूची सुटका होण्यासाठी आपण सर्व मित्रांनी खारीचा का होईना वाटा उचलू !

डॉक्टरांच्या वेदना आपण नाही घेऊ शकत पण प्रेमाची आर्थिक मदत आपण सर्वजण नक्कीच करू शकतो मित्रानो !

हे आवाहन मी (राजू कुलकर्णी) डॉक्टरांच्या सुविद्य पत्नी सौ. अंजली वहिनी यांच्या अनुमतीने करत आहे.

या खाली मी डॉक्टरांचे अकाऊंट डिटेल्स देत आहे....तसेच वेळोवेळी डॉक्टरांच्या प्रकुती, त्यांची चालू असलेली ट्रीटमेंट या विषयीची अपडेट मी फेसबुक माध्यमातून मी आपणास देत राहीन मित्रांनो !

आपला

©®

राजू कुलकर्णी

डोंबिवली पूर्व.

Dr Villas Ujawane.. Saraswat Co-operative Bank. A/C No. 130200100009758. IFSC SRCB0000130

Dr Villas Ujawane.. Saraswat Co-operative Bank. A/C No. 005200100030302. IFSC SRCB0000005.

डॉ विलास उजवणे यांनी अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. 'चार दिवस सासूचे', 'वादळवाट' या त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय मालिका. एखाद्या कलाकाराला काम नसेल तर तो हळूहळू विस्मरणात जातो. मात्र नंतर त्यांचे असे हाल बघून वाईट वाटते. अभिनेते विलास उजवणे यांना आता मदतीची नितांत गरज असल्याची हाक त्यांच्या मित्राने दिली आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेताहॉस्पिटल