तेनाली रामामध्ये रामा सोडणार विजयनगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 16:00 IST
आपल्या शत्रूंविरुद्ध लढा असो वा कोणतीही कठीण अडचण सोडवायची असो, तेनाली रामाला देण्यात येणाऱ्या प्रत्येक कठीण कामातून प्रेक्षकांचा आवडता ...
तेनाली रामामध्ये रामा सोडणार विजयनगर
आपल्या शत्रूंविरुद्ध लढा असो वा कोणतीही कठीण अडचण सोडवायची असो, तेनाली रामाला देण्यात येणाऱ्या प्रत्येक कठीण कामातून प्रेक्षकांचा आवडता रामा यशस्वीरित्या वाट काढतोच. या आठवड्यात टेलिव्हिजनच्या आवडत्या रामासाठी अजून एक आव्हान येणार आहे. येत्या भागात आपल्याला दिसेल की, विजयनगरमधील विश्वनाथ आपल्या बाळाच्या जन्माच्या वेळी त्याच्या बायकोला मदत न केल्याची तक्रार घोडेस्वार प्रसादसंदर्भात करतो. आपल्या पत्नीच्या उपचाराकरता जमवलेली सर्व जमापुंजी विश्वनाथ खर्ची घालतो. त्यामुळे प्रसादने या रकमेची भरपाई करावी असे विश्वनाथला वाटत आहे. विश्वनाथला प्रसादने या रकमेची भरपाई करावी असा सल्ला रामा (कृष्णा भारद्वाज)ने हे प्रकरण सोडविताना दिला. परंतु आपल्या न्यायाची घोषणा करण्यापूर्वी राजा कृष्णदेवराय (मानव गोहील) समक्ष न्यायालयात कल्लुरी नावाचा मनुष्य येऊन उभा राहतो आणि रामाचा सल्ला चुकीचा आहे हे सिद्ध करतो आणि अशी प्रकरणे सोडविण्यासाठी प्रत्येक आठवड्यात कुटुंब न्यायालय उभे करावे असा सल्ला राजा कृष्णदेवराय यांना देतो. राजा अत्यंत प्रभावित होऊन कल्लुरीला बक्षीस देतो. कल्लुरी रामाला त्याच्या बालपणीच्या नावाने संबोधतो त्यामुळे नक्की कल्लुरी (अभिषेक रावत) कोण आहे असा प्रश्न रामाला पडतो. तेव्हा दोघांदरम्यान स्पर्धेची घोषणा राजा कृष्णदेवराय करतात. कुटुंब न्यायालय ठेवण्याचा निर्णय घेऊन रामा आणि कल्लुरीच्या समोर अनेक प्रकरणे ठेवण्यात येतात आणि जो योग्य सल्ला देईल तो जिंकेल असे घोषित करण्यात येते. पहिल्या प्रकरणात, रामा आणि कल्लुरी दोघांचाही सल्ला राजा कृष्णदेवरायांना पटल्यामुळे दोघांनाही एक गुण प्रत्येकी मिळतो. वरुणमालाच्या दुसर्या प्रकरणात, रामा एक पाऊल पुढे जातो आणि आणखी एक गुण मिळवितो. त्या पुढील प्रकरणात, एका मुलासह दरबारात दोन विवाहित जोडपे प्रवेश करतात. त्यापैकी एकाने त्या मुलाला जन्म दिला आहे तर दुसर्याने त्याला वाढविले आहे. राजा कृष्णदेवराय कल्लुरीने सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे आपला निर्णय देतात आणि मुलगा आपल्या जन्मदात्या पालकांसह राहील अशी घोषणा करतात. हा निर्णय अयोग्य वाटल्याने रामा न्यायालय सोडून निघून जातो आणि विजयनगरचा मुख्य सल्लागार या पदावरून आपला राजीनामा देतो. त्यानंतर रामा आणि त्याचे कुटुंब विजयनगर सोडणार का? कल्लुरीचा द्वेष राजा कृष्णदेवराय पाहू शकतील का? रामाची मदत करण्यासाठी राणीची काय महत्त्वाची भूमिका असेल? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत मिळणार आहेत.मालिकेत येणाऱ्या या वळणाविषयी तेनाली रामाची भूमिका साकारणारा कृष्ण भारद्वाज सांगतो, रामाची प्रतिष्ठा आणि सल्लागार म्हणून असणारे त्याचे काम अतिशय गंभीर वळणावर आहे. रामाला केवळ आपली हुशारी सिद्ध करायची नाही तर आपल्या जुन्या शत्रुशीदेखील लढा द्यायचा आहे.”Also Read : तेनाली रामा या मालिकेत मानव गोहिल दिसणार एका वेगळ्या रूपात