Join us

बॉलिवूडच्या विद्याची झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री, दिसणार शिक्षिकेच्या भूमिकेत, प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:55 IST

आता पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विद्या सज्ज झाली आहे. पण, यावेळी विद्या बालन चक्क मराठी मालिकेत दिसणार आहे. 

विद्या बालन ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या विद्याने तिच्या अभिनय कारकीर्दिला टेलिव्हिजनपासून सुरुवात केली होती. हम पांच या मालिकेतून विद्याने प्रसिद्धी मिळवली. आता पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विद्या सज्ज झाली आहे. पण, यावेळी विद्या बालन चक्क मराठी मालिकेत दिसणार आहे. 

झी मराठीवर 'कमळी' ही नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत विद्या बालनची एन्ट्री झाली आहे. विद्या या मालिकेत शिक्षिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. कमळीला ती शिक्षणाचे आणि व्यवहार ज्ञानाचे धडे देताना दिसणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये विद्या कमळीला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. "भारताची आर्थिक राजधानी कोणती?" असं विचारताच कमळी मुंबई असं उत्तर देते. नंतर ती कमळीला मुंबईतील विमानतळाचं नाव काय, असं विचारते. त्यावर कमळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं उत्तर देते. तिसऱ्या प्रश्नावर मात्र कमळीची बोबडी वळते.

 

कमळी आणि विद्याचा हा मजेशीर प्रोमो व्हिडिओ चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. विद्या बालनला कमळी मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आजपासून ही मालिका झी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

टॅग्स :विद्या बालनझी मराठी