Join us

"दीराने ओढलं मला, नणंदेने पाडलं मला, सासूने...", वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर उत्कर्ष शिंदेचं 'हुंडाबळी' गाणं, मांडली पीडितेची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:48 IST

उत्कर्षने त्याचं हुंडाबळी हे गाणं प्रदर्शित करत त्यातून पीडितेची व्यथा मांडली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. हुड्यांसाठी सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याने २३ वर्षीय वैष्णवीने स्वत:ला संपवल्याची दुर्देवी घटना १६ मे रोजी घडली. ही घटना समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय नेत्यांपासून ते सेलिब्रिटी आणि सर्वसामान्यही त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता आणि सिंगर 'बिग बॉस मराठी' फेम उत्कर्ष शिंदे यानेदेखील संताप व्यक्त केला होता. आता उत्कर्षने त्याचं हुंडाबळी हे गाणं प्रदर्शित करत त्यातून पीडितेची व्यथा मांडली आहे. 

उत्कर्षने त्याचं 'हुंडाबळी' हे गाणं विजय आनंद म्युझिक या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केलं आहे. हे गाणं त्याने 'बिग बॉस मराठी'च्या घरातही सादर केलं होतं. त्याची छोटीशी व्हिडिओ क्लिप त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

"दीराने ओढलं मला, नणंदेने पाडलं मला, सासूने झोडलं मला, कुणी ना सोडलं मला...शेवटी नवऱ्याने हुंड्यापायी जाळलं मला", असे उत्कर्षच्या गाण्याचे बोल आहेत. काही वर्षांपूर्वी त्याने लिहिलेलं हे गाणं वैष्णवी हगवणे हुंडा प्रकरणाच्या घटनेशी मिळतं जुळतं आहे. तशा कमेंटही चाहत्यांनी त्याच्या व्हिडिओवर केल्या आहेत. 

दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरण हाय ट्रॅकवर चालवण्याची मागणी होत आहे.  या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तपासाला वेग आला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत वैष्णवीची सासू, नणंद करिष्मा हगवणे, पती शशांक, दीर सुशील आणि सासरा राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :वैष्णवी हगवणेटिव्ही कलाकार