Join us  

लेकासाठी मैदानात उतरले उदित नारायण, अमित कुमार यांना केले लक्ष्य; म्हणाले, आदित्य अल्लड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 10:38 AM

Udit Narayan on Indian Idol 12 row : आदित्य नारायण याने अमित कुमार यांच्या या आरोपांना उत्तर दिले आणि तो जबरदस्त ट्रोल झाला. अशात आता त्याचे वडिल व प्रख्यात गायक उदीत नारायण यांनी या वादात उडी घेतली आहे. 

ठळक मुद्देआदित्यवर चहूबाजुंनी टीका होत असताना सर्वांनी त्याला साथ द्यायला हवी होती, पण असे काहीही घडताना दिसले नाही, असे उदित नारायण म्हणाले.

‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) हा सिंगींग रिअ‍ॅलिटी शो सध्या वादात सापडला आहे. आधी ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’वर टीका झाली. याच टीकेच्या पार्श्वभूमीवर या एपिसोडमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून आलेले किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार यांनी काही शोवर काही आरोप केले. शोचा होस्ट आदित्य नारायण याने अमित कुमार (Aditya Narayan on Amit Kumar ) यांच्या या आरोपांना उत्तर दिले आणि तो जबरदस्त ट्रोल झाला. अद्यापही तो ट्रोल होतोय. अशात आता त्याचे वडिल व प्रख्यात गायक उदीत नारायण  (Udit Narayan) यांनी या वादात उडी घेतली आहे. आदित्य अद्याप अल्लड आहे. त्यामुळे तो बोलला आणि संपूर्ण वाद त्याच्यावर केंद्रीत झाला, अशा शब्दांत उदित नारायण यांनी लेकाची पाठराखण केली आहे. सोबत अमित कुमार यांच्यावरही निशाणा साधला आहे. (Udit Narayan on Indian Idol 12 row)

सर्व दोष आदित्यला देणे योग्य नाही...‘आज तक’शी बोलताना उदित नारायण यांनी मुलगा आदित्यची पाठराखण केली. प्रत्येकवेळी नव्या टॅलेंटवर टीका करणे योग्य ठरत नाही. आदित्यमध्ये अद्यापही अल्लडपणा आहे. शिवाय तो प्रचंड संवेदनशील आहे. इंडियन आयडल शो होस्ट करत असल्याने तो सेन्सिटिव्ह झाला आणि शांत न बसता बोलला. शोची संबंधित अन्य लोक या वादावर शांत राहिले. एकटा आदित्य बोलला आणि सर्व त्याच्यावर उलटले. माझ्या मते, सगळे खापर त्याच्या माथ्यावर फोडणे योग्य नाही. शोच्या मुख्य लोकांनी यावर बोलायला हवे होते. पण त्यांनी अँकरलाच समोर केले. आदित्यवर चहूबाजुंनी टीका होत असताना सर्वांनी त्याला साथ द्यायला हवी होती, पण असे काहीही घडताना दिसले नाही, असे उदित नारायण म्हणाले.

अमित कुमार यांनी अशा गोष्टी बोलायला नको होत्या...

अमित कुमार यांच्या टीकेलाही उदित नारायण यांनी उत्तर दिले. मी अमित कुमार यांचा एपिसोड पाहिला होता. शोमध्ये ते एन्जॉय करत होते. शोमध्ये आल्यानंतर तुम्ही अशाप्रकारच्या गोष्टी बोलणे योग्य नाही. आता मी आदित्यची बाजू घेतली तर मलाही या वादात ओढले जाईल. मी अमित कुमार यांना चांगल्याप्रकारे ओळखतो.आता या मुद्यावर मी त्यांच्याशीही बोलणार आहे, असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते अमित कुमार?

दोन आठवड्यांपूर्वी लोकप्रिय गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी ‘इंडियन आयडल 12’च्या ‘किशोर कुमार एपिसोड’मध्ये हजेरी लावली होती. परंतु, या भागावर प्रेक्षकांनी जोरदार टीका केल्यानंतर अमित यांनी देखील कार्यक्रमाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. स्पर्धकांनी किशोर कुमार यांना ट्रिब्यूट दिला होता. परंतु, हा भाग प्रेक्षकांना खास पसंत पडला नव्हता. या पार्श्वभूमीवर अमित यांनीही कार्यक्रमाचा हा भाग त्यांना आवडला नसल्याचे म्हटले होते. ‘मला सांगण्यात आले की सगळ्यांचे कौतुक करायचे आहे. मग ते कसेही गायले तरीही त्यांचे कौतुकच करायचे. कारण हा भाग किशोर कुमार यांच्या गाण्यांवर असणार आहे. मी तेच केलं जे मला करण्यासाठी सांगण्यात आले, असे अमित कुमार म्हणाले होते.

टॅग्स :उदित नारायणआदित्य नारायणअमित कुमारइंडियन आयडॉल