Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शार्क टँक'च्या विनीता सिंहला स्विमिंग करताना आला पॅनिक अटॅक, मुलांसाठी लिहिली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 11:50 IST

शार्क टँक इंडिया सीझन-२ मध्ये जज म्हणून दिसणारी विनीता सिंह हिनं ट्रायथलॉनमध्ये सहभागी घेतला होता.

नवी दिल्ली-

शार्क टँक इंडिया सीझन-२ मध्ये जज म्हणून दिसणारी विनीता सिंह हिनं ट्रायथलॉनमध्ये सहभागी घेतला होता. यात स्विमिंग करताना तिला पॅनिक अटॅक देखील आला होता. यामुळे विनीता सिंह हिचा स्पर्धेत शेवटचा क्रमांक आला. या स्पर्धेनंतर विनीता हिनं तिच्या दोन मुलांसाठी भावूक आणि प्रेरणादायी मेसेज लिहिला. विनीता सिंह एक यशस्वी उद्योगपती आहे आणि फिटनेसचीही तिला आवड आहे. ती एक अॅथलीट असून मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेत असते. नुकतंच तिनं ट्रायथलॉनमध्ये सहभाग घेतला होता. याच स्पर्धेला तिनं आजवरची सर्वात कठीण स्पर्धा म्हणून नमूद केलं आहे. 

विनितानं पोस्ट म्हटलं की, "माझा स्पर्धेत शेवटचा नंबर आला. मी नेहमीच पोहण्याच्याबाबतीत संघर्ष करत आले आहे. दुर्दैवाने सर्व ट्रायथलॉन्स पोहण्यापासूनच सुरू होतात. तेही खुल्या समुद्रात. गेल्या आठवड्यातील शिवाजी ट्रायथलॉन ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण शर्यत होती. त्यात अनेक लाटा उसळत होत्या आणि वारा वाहत होता. त्यामुळे मला पॅनिक अटॅक आला. तोही १ तास होता. मात्र, अनेकांनी माझं मनोबल वाढवलं. मला श्वास घेता येत नव्हता, म्हणून मी त्यांना मला घेऊन जाण्यास सांगितलं. मला बचाव पथकानं उचलले आणि मी स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला, जे माझ्यासाठी खूप वेदनादायक होतं"

विनीता सिंहने शर्यत सोडण्याचे ठरवलेविनीता सिंह पुढे म्हणाली की, "माझ्यात हिंमत होत नव्हती. मी बोटीतून परत येत असताना मला ९ वर्षांची एक धाडसी मुलगी लाटांशी लढत आणि पुढे जाताना दिसली. मी शर्यत सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी प्रशिक्षणही पूर्ण केलं नव्हतं पण मी माझ्या मनाला आव्हान दिलं होतं. शर्यतीत वेळेची मर्यादा नव्हती, त्यामुळे माझ्याकडे कोणतेही निमित्त नव्हतं. यामुळे मी पुन्हा एकदा पाण्यात उडी मारली"

'आई आज शेवटची आली पण तिनं शर्यत सोडली नाही'"मी पोहायला सुरुवात केली. जिथं ३९ मिनिटं लागणार होती तिथं मला दीड तास लागले. पण शेवटी मी पाण्यातून बाहेर पडले जिथे प्रत्येकाने आपली शर्यत १०:३० पर्यंत संपवली होती. ते पूर्ण करण्यासाठी मला दुपारचे १२:२० वाजले. १०० नौदलाचे जवान माझा जयजयकार करत होते. INS शिवाजीच्या सर्व लोकांचे मी आभार मानते. शेवटी मी आले आणि मुलांना सांगितले की आई आज शेवटून पहिली आली, पण मी स्पर्धा सोडली नाही", असंही विनीता सिंहनं सांगितलं.