Join us

झी मराठीवरील 'ही' मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 17:49 IST

झी मराठीवरील ही मालिका २३ डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

झी मराठी वाहिनीवर सध्या एका पेक्षा एक दमदार मालिका दाखल झाल्या आहेत. यात तू चाल पुढं, सारे काही तिच्यासाठी, सातव्या मुलीची सातवी मुलगी, तुला शिकवीन चांगलाच धडा, नवा गडी नवं राज्य या मालिकांचा समावेश आहे. या मालिकेतील एक मालिका २३ डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका म्हणजे नवा गडी नवं राज्य. काही दिवसांपूर्वीच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पार पडले. यावेळी मालिकेतील सगळ्या कलाकारांनी शूटिंगच्या शेवटचा दिवस सेलिब्रेट केला. या मालिकेत राघवच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते सेटवरील शेवटचा दिवस साजरा करत आहे. 

अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी सेटवरचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, NGNR मालिकेच्या समारोपचा केक. आमच्या दोन बाळकलाकारांनी कापला..चिंगी आणि श्रीअंग शेवट गोड सगळंच गोड.. वर्षा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत सेटवर सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र आलेले दिसत आहेत. मालिकेतल्या बालकलाकारांनी केक कापला. मिळालेल्या माहितीनुसार १० डिसेंबरला मालिकेचे शूटींग संपले. हा व्हिडिओ त्याच दिवशीचा आहे.

अभिनेत्री श्रृती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर यांच्या ‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ची निर्मिती असलेली नवा गडी नवं राज्य मालिका ८ ऑगस्ट २०२२ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे अशी कलाकार मंडळी असलेली या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. दरम्यान झी मराठीवर 'पारू' आणि शिवा' या दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. या मालिकांची वेळ आणि कथानकाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही.

टॅग्स :झी मराठी