स्टार प्रवाह वाहिनीवरील 'थोडं तुझं थोडं माझं' ( Thoda Tuza Thoda Maza Serial) ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शेवटच्या एपिसोडचं शूटिंग नुकतंच पार पडलं. या मालिकेत मानसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तिने सेटवरील फोटो आणि अनुभव शेअर करत मालिकेला भावनिक निरोप दिला आहे.
शिवानी सुर्वेनं 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर करत लिहिले की, 'थोडं तुझं, थोडं माझं' ह्या सुंदर प्रवासाचा आज शेवट झाला. कोणताही प्रोजेक्ट सुरू करताना आपल्याला माहीत असतं की एक दिवस तो संपणार आहे, कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट असतोच. आणि आज, आम्हाला असं वाटतंय की आम्ही एक वर्तुळ पूर्ण केलं आहे. प्रिय प्रेक्षकांनो, तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद! मानसीवर तुम्ही जे प्रेम केलं, ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आम्ही नेहमीच तुमचे ऋणी राहू.
तिने पुढे सहकलाकारांबद्दल लिहिले की, मानसी कुलकर्णी, तुम्ही मला अनेक प्रकारे प्रेरणा दिली. तुम्ही अशी महिला आहात, जिच्याकडे मी आदराने पाहते. तुम्ही एक खंबीर आणि तरीही सालस स्त्रीचं खरं उदाहरण आहात. समीर परांजपे, तू म्हणजे गंमतीचा साठा आहेस! तुझे विनोद, तुझी ऊर्जा आणि तू सगळ्यांना ज्या प्रकारे हसवतो, ती तुझी खरी ताकद आहे. तू प्रत्येक बॉलवर सिक्सर मारतोस. प्रणव प्रभाकर शांत घोडा! शांत, संयमी आणि सभ्य - प्रत्येक अर्थाने एक खरे सज्जन. अमोघ चंदन - सर्वात चांगल्या अर्थाने तुम्ही एक 'नटखट' आहात! अनुभवाने वरिष्ठ असूनही मनापासून आनंदी आणि लहान मुलांसारखे आहात. तुमच्यासोबत काम करताना खूप मजा आली. ऋवेद फडके - स्पष्ट, व्यावसायिक आणि ज्यांच्यासोबत काम करण्याचा मला खूप आनंद झाला. मानसी घाटे - तुझ्यासोबत जास्त शूटिंग करायला मिळालं नाही, पण तू ज्या प्रकारे खंबीरपणे उभी राहिलीस, त्यासाठी मी तुझा खूप आदर करते. अंजली जोगळेकर आणि चंद्रशेखर कुलकर्णी - तुमच्याबद्दल बोलायला शब्दही अपुरे आहेत. तुमच्यासाठी फक्त खूप प्रेम, आदर आणि कृतज्ञता.
शिवानी पुढे म्हटले की, आणि अर्थातच, आमचे कॅप्टन ऑफ द शीप श्री चंद्रकांत कणसे सर! मी अशा शांत दिग्दर्शकासोबत कधीही काम केलं नाही, जो कोणत्याही परिस्थितीत शांत राहतो. तुम्हाला सलाम. 'बॉस शांत असेल तर टीमही शांत राहते' हे सर्वात मोठं शिकवणं मला तुमच्याकडून मिळालं. खरं सांगायचं तर, आपला एकत्र वेळ कमी होता आणि तुम्हाला माहीत आहे की मला मनमोकळेपणाने बोलायला वेळ लागतो... पण मालिका संपली तेव्हा मला वाटलं की आपण आता कुठे मित्र बनत होतो. तुम्ही प्रतिभेचा एक साठा आहात आणि तुमच्या शांत स्वभावासाठी, तुमच्या व्यक्तिमत्त्वासाठी आणि तुमच्या कल्पनाशक्तीसाठी मी तुमचा नेहमीच आदर करेन. आणि आता, माझ्या पडद्यामागील सुपरहिरोंना माझ्या ग्लॅम स्क्वॉडला! स्वामी भगणे - शांतपणे मदत करणारा जो कुणालाही न कळवता शंभर गोष्टी ठीक करतो. सनी पाटकेर - माझा मेकअप जादूगार. मला रोज कॅमेऱ्यासाठी तयार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कविता शेठ - ... १० वर्षं झाली! तू अक्षरशः माझ्या प्रवासाला (आणि माझ्या केसांच्या स्टाईलला!) आकार दिला आहे आणि माफ कर, तू पुढची अनेक वर्षं माझ्यासोबत अडकलीस. सुटका नाही! सर्वांना खूप खूप प्रेम.