Join us

​रात्रीस खेळ चाले या मालिकेतील अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांची 'ही' उत्तरे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2016 16:50 IST

रात्रीस खेळ चाले या मालिकेचा शेवट नुकताच झाला. ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत अजय आणि अॅड. नेने ...

रात्रीस खेळ चाले या मालिकेचा शेवट नुकताच झाला. ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत अजय आणि अॅड. नेने यांचा खून कोणी केला याचे गूढ मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत कायम राहिले. मालिकेची कथा शेवटपर्यंत इतकी चांगली रंगवण्यात आली होती की, प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक संशय घेत होते. मालिकेच्या शेवटच्या भागापर्यंत प्रेक्षकांना या मालिकेने खिळवून ठेवले. मालिकेच्या शेवटच्या भागात निलिमाने खून केल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. निलिमा खुनी आहे हे प्रेक्षकांना कळले असले तरी या मालिकेतील अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. या प्रश्नांची रात्रीस खेळ चाले या मालिकेचे निर्माते आणि लेखक संतोष अयोचित यांनी सीएनएक्सच्या वाचकांना दिलेली खास उत्तरे...रात्रीस खेळ चाले या मालिकेत माधव, निलिमा, दत्ता, सविता, अभिराम, सुषमा, गणेश, नाथा, पांडू या सगळ्यांवरती विश्वासरावचा संशय असल्याचे आपल्याला दाखवण्यात आले. पण शेवटच्या भागात निलिमा खुनी असल्याचे सगळे पुरावे विश्वासरावला मिळाले आणि या रहस्यावरचा पडदा उठला. काही क्षणातच निलिमानेदेखील ती खुनी असल्याचे कबूल केले. पण हा शेवटचा भाग पाहाताना मालिकेचा शेवट खूपच गुंडाळला गेला असल्याचे अनेक प्रेक्षकांचे म्हणणे होते. प्रेक्षकांना या मालिकेच्या कथानकाबद्दल अनेक प्रश्न पडले आहेत. यावर संतोष अयाचित सांगतात की, "मालिकेच्या सुरुवातीपासूनच सगळ्या व्यक्तिरेखा आम्ही अतिशय योग्यरितीने मांडल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी या मालिकेचा एकही भाग चुकवला नाही त्यांना हे प्रश्न कधीच पडणार नाहीत. आम्ही सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टी खूप चांगल्याप्रकारे सांगितल्या आहेत. तसेच निलिमाचे खून करण्यामागचे उद्दिष्ट काय होते हे देखील आम्ही स्पष्ट केले आहे. तसेच दत्ताची विचारपूस सुरू केली, तेव्हापासून अनेक गोष्टी आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच गोष्टी क्लिष्ट करून सांगण्यापेक्षा मी त्या खूप सोप्या पद्धतीने सांगितल्या. त्यामुळे प्रेक्षकांना कोणते प्रश्न पडले असतील असे मला वाटत नाही."घरातील जेवणात अळ्या पडणे, दगडफेक होणे या गोष्टी कोणी घडवून आणल्या होत्या?निलिमा वैज्ञानिक असल्याचे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे जेवणात अळ्या पडाव्यात यासाठी काय करायला पाहिजे हे तिला चांगलेच माहीत असल्याने तिनेच ते केलेले आहे हे वेगळे सांगायला नको. या बारीकसारीक गोष्टी आम्ही स्पष्ट केल्या नसल्या तरी भुताटकी तिनेच निर्माण केली असल्याचे आम्ही दाखवले. तसेच फोनवर शेवंताचा आवाजदेखील तिनेच काढला होता हेदेखील लोकांना सांगितले.नेने आणि अजय यांच्या खुनाविषयी इत्भूंत माहिती माधवने त्यांच्या कादंबरीत कशी लिहिली होती?माधव हा खूप चांगला लेखक असूनही त्याला आजही प्रसिद्धी मिळाली नाहीये. आपल्या नावाला महत्त्व मिळावे अशी त्याची नेहमीच इच्छा आहे. त्यामुळे तो घरात घडत असलेल्या काही घटना आणि काही त्याने न पाहिलेल्या गोष्टी कादंबरीत लिहितो हे दाखवण्यात आलेले आहे. त्याने आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर काही गोष्टी मांडल्या आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी त्याच्या कादंबरीत आहेत. तसेच तो मानसिक रुग्ण असल्याचेही मालिकेत दाखवण्यात आले होते. गुरव, अभिरामची सासू, गणेश आणि गणेशचा गुरू यांना का अटक करण्यात आली होती? त्याचे पुढे काहीही दाखवले नाही.भानूमती करणे अथवा काळी जादू करणे या दोन्ही गोष्टी कायद्यानुसार गुन्हा आहेत. या तिघांचाही अशा गोष्टींमध्ये समावेश असल्याने त्यांना चौकशीसाठी अटक करण्यात आली होती. पण त्यांचा अजय आणि नेनेच्या खुनांमध्ये काहीही समावेश नसल्याचे कळल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले.