Join us

अभिनेत्री श्वेता शिंदेच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक, १८ तोळ्यांचे दागिने हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 14:11 IST

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या घरी चोरी झाली. श्वेता शिंदे यांच्या घरुन दागिने चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक झालीय (shweta shinde)

अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या बंगल्यातून दागिने तसेच रोकड चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल १८ तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले. त्याने एकूण तीन घरफोडीची कबुली दिली. राजकुमार उर्फ राजू ओंकारप्पा आपचे (वय ३०) असे अटक केलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्यामुळे श्वेता शिंदेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

अभिनेत्री श्वेता शिंदे यांचा सातारा शहराजवळील गोरखपूर, पिरवाडी येथे बंगला आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे ३ लाख ८२ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांना माहिती मिळाली की, ही घरफोडी पोलिस रेकाॅर्डवरील राजू आपचे याने केली असून तो सातारा शहर व तालुका परिसरात वावरत आहे.

या माहितीनुसार देवकर यांनी तातडीने पथक तयार करून त्याला अटक करण्याच्या सूचना केल्या. पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या पथकाने राजू आपचे याला २८ जून रोजी वाढे फाटा परिसरातून रात्री अटक केली. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या बंगल्यात चोरी केल्याची कबुली दिली. तसेच भुईंज, लोणंद येथेही घरफोडी केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे १८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने सुमारे १२ लाखांचे हस्तगत केले.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल, पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, संतोष सपकाळ, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, सचिन ससाणे, केतन शिंदे, मयूर देशमुख आदींनी कारवाईत भाग घेतला.

टॅग्स :श्वेता शिंदेमराठीमराठी अभिनेता