Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ठरलं तर मग' आणि 'मुरांबा'मध्ये पाहायला मिळणार होळी आणि धुलिवंदनाची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 07:00 IST

छोट्या पडद्यावर होळी आणि धुलिवंदनाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

रंगांची मनसोक्त उधळण करून आपापसातले सारे हेवेदावे विसरायला लावणारा सण म्हणजे होळी. छोट्या पडद्यावर होळी आणि धुलिवंदनाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. ठरलं तर मग मालिकेत सायली आणि अर्जुनचा लग्नानंतरचा हा पहिलाच होळी सण. सुभेदार कुटुंबात रितीरिवाजाप्रमाणे होळीची पारंपरिक पूजा होणार आहे. यासोबतच धुलिवंदनाला रंगांची उधळणही होणार आहे. 

सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असलं तरी सायली आणि अर्जुन मात्र आपल्याला कुणी रंग लावणार नाही याची खबरदारी घेताना दिसणार आहेत. इतकी काळजी घेऊनही या दोघांवर अक्षरश: रंगांची बरसात होते. अर्जुन आणि सायली रंगात कसे रंगून गेलेत हे मालिकेच्या येत्या होळी स्पेशल भागांमध्ये पाहायला मिळेल.

मुरांबा मालिकेतही होळीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. पहिल्या होळीचा पहिला रंग अक्षयला रमाला लावायचा आहे. रमासोबत रंग खेळण्याची स्वप्न पाहणारा अक्षय योगायोगाने रेवाला पहिला रंग लावतो.  रेवा मनातून खुष होते खरी. मात्र माझ्या प्रेमावर फक्त रमाचा हक्क आहे असं अक्षय तिला ठणकावून सांगतो. त्यामुळे मुरांबा मालिकेतला धुलिवंदनाचा सण खऱ्या अर्थाने रमा आणि अक्षयसाठी खास ठरणार आहे.

ठरलं तर मग आणि मुरांबा प्रमाणेच ठिपक्यांची रांगोळी, लग्नाची बेडी, अबोली आणि तुझेच मी गीत गात आहे मालिकेतही होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाहहोळी 2023