झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'या सुखांनो या' (Ya Sukhano Ya). २००५ ते २००८ या तीन वर्षाच्या कालावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत विक्रम गोखले, ऐश्वर्या नारकर, राजन भिसे, शर्वरी लोहकरे, गिरीश परदेशी, संपदा जोगळेकर, रेशम टिपणीस, लोकेश गुप्ते, उपेंद्र लिमये अशी तगडी स्टारकास्ट होती. या मालिकेत ऐश्वर्या नारकर आणि राजन भिसे यांच्या लेकीची भूमिका बालकलाकार श्रद्धा रानडेने साकारली होती. श्रद्धा रानडे (Shraddha Ranade) नुकतीच लग्नबांधनात अडकलेली पाहायला मिळत आहे.
श्रद्धा रानडेच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लग्नाची लगबग पाहायला मिळत होती. ग्रहमख पूजन, मेंदी सोहळा, हळद आणि संगीत सोहळ्याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तिची खास मैत्रीण अभिनेत्री अन्वीता फलटणकर ही तिच्या सर्व कार्यक्रमांना हजर होती. अन्वीता तिची पाठराखण होती. तिने लग्नात खूप धमाल केली. श्रद्धाने कोणासोबत लग्नगाठ बांधली हे अजून गुलदस्त्यात असले तरी लग्नाची बातमी तिने जाहीर करताच सेलिब्रिटींनीही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
श्रद्धा रानडेला 'या सुखांनो या' मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. पण आता ती अभिनय क्षेत्रात फारशी सक्रीय पाहायला मिळत नाही. कॉलेजचे शिक्षण पूर्ण करत तिने नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. काहीच महिन्यांपूर्वी श्रद्धाने भरतनाट्यममध्ये विशारद मिळवली आहे.