Join us

"माझ्याही पेक्षा जास्त प्रेक्षकांचं आईवर प्रेम आहे..", ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर लेक पोर्णिमाची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 09:18 IST

Poornima Pandit : 'ठरलं तर मग' मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे कलाकारांसह प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसला आहे. प्रेक्षकांचं प्रेम पाहून ज्योती चांदेकर यांची मुलगी पोर्णिमा पंडितने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे कलाकारांसह प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसला आहे. प्रेक्षक सोशल मीडियावर मालिकेत पूर्णा आजीची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असे वारंवार सांगत आहेत. प्रेक्षकांचं प्रेम पाहून ज्योती चांदेकर यांची मुलगी पोर्णिमा पंडित(Poornima Pandit)ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने माझ्याही पेक्षा जास्त प्रेक्षकांचं आईवर प्रेम असल्याचं म्हटलं आहे.

पोर्णिमा पंडितने सोशल मीडियावर ज्योती चांदेकर यांचा ठरलं तर मग मालिकेतला फोटो शेअर केला आणि यासोबतच प्रेक्षकांनी केलेल्या कमेंट्सचा स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तिने लिहिले की, ''मी, प्रेक्षक आणि ज्योती चांदेकर-पंडित (आई ). मला कळायला लागलं त्या वयापासून आपली आई बाकीच्या मित्र मैत्रिणींच्या आयांपेक्षा वेगळी आहे हे हळू हळू कळू लागलं होतं . आई मला आणि तेजू ला कधीच पुरायची नाही, तिचा हवा तेवढा सहवास मिळायचा नाही म्हणून मी आईच्या नाटकांना जायचे . विंगेमधून प्रेक्षक किती आलेत हे छोट्याशा फटीतून लपून बघायचे आणि नेहमी ती गर्दी बघून मला आश्चर्य वाटायचं , की माझ्या आईला बघायला एवढे लोक येतात.''

''प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमाचा वर्षाव शब्दात मांडणं कठीण''

तिने पुढे म्हटले, ''वर्दीवाले आणि नाटक, सिनेमामध्ये काम करणारे घरी कधी येतील ह्याचा पत्ताच नसतो असं माझी आज्जी म्हणायची. तेव्हा आपली आई ह्या प्रेक्षकांना छान वाटावं म्हणून तिची कला सादर करत कायम दौऱ्यांवर असते आणि आपल्यापासून लांब असते हे डोक्यात बसलं होतं. माझ्याही पेक्षा जास्त प्रेक्षकांचं आईवर जास्त प्रेम आहे हे मला एक मुलगी म्हणून कधीच पटलं नाही. पण आई आता गेली ,अशी अचानक आम्हाला सोडून गेली आणि माझा हा विचार अलगद पुसून गेली. पूर्वी नाटक, नंतर सिनेमा आणि आता वयाच्या ह्या टप्प्यात मालिकांमधला प्रेक्षक आणि प्रेम करणारा वर्ग हा वर्षानुवर्षे वाढतच गेला. माझ्या आणि तेजूच्या जवळच्या माणसांनी, कुटुंबाने आम्हाला खूप साथ दिलीच पण तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी जो प्रेमाचा वर्षाव केलाय तो शब्दात मांडणं कठीण.''

''अजूनही सोशल मीडियावर पूर्णा आज्जीला रिप्लेस करू नका, तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही ,पूर्णा आज्जी गावाला गेली आहे असं दाखवा हीच खरी श्रद्धांजली,असा कलाकार होणे नाही अश्या अगणित कमेंट्स पाहून आपल्या आईने काय कमावून ठेवलं , किती प्रेक्षक जोडले आहेत ह्याची प्रचिती आली. आता पटतंय , कलाकार हा आधी प्रेक्षकांचा असतो, मग घरच्यांचा असतो. माझी आई म्हणजे ज्योती चांदेकर- पंडित, एक रंगकर्मी,कलाकार. अनेक संकटांमधून वाट काढत ती तिचं आयुष्य थाटात जगली ,रूबाबात राहिली ,माणसं जोडली,नाती बनवली, प्रेम वाटलं आणि प्रेम मिळवलं. ह्या दुःखात आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या आमचा आधार झालेल्या सर्व कुटुंबियांचे,मित्र परिवाराचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार.'', या पोस्टमध्ये पोर्णिमाने म्हटले आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाहतेजस्विनी पंडित