Join us

लागिरं झालं जी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 16:23 IST

लागिरं झालं जी ही मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत प्रेक्षकांना नितिश चव्हाण आणि शिवानी बोरकर ...

लागिरं झालं जी ही मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत प्रेक्षकांना नितिश चव्हाण आणि शिवानी बोरकर यांची जोडी पाहायला मिळणार आहे. या मालिकेत नितिश अजिंक्य तर शिवानी शीतल ही भूमिका साकारणार आहे. सातारा जिल्ह्याची सैनिकांचा जिल्हा अशीदेखील एक ओळख आहे. यातील बहुतांश घरातून एखादा तरी मुलगा सैन्यात असतोच अशाच या साताऱ्या जिल्ह्यातील चांदवडी गावातील अजिंक्यची या मालिकेत कथा पाहायला मिळणार आहे. त्याचे आई-वडील तो लहान असतानाच वारतात. त्यामुळे तो त्याच्या आजीच्या घरी लहानाचा मोठा झालेला असतो. अजिंक्यचे केवळ एकच स्वप्न आहे आणि ते म्हणजे सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करायची. पण यासाठी अजिंक्यच्या घरातल्यांचा विरोध आहे. त्याच्या मामा-मामीची एकुलती एक मुलगी जयश्रीशी अजिंक्यचे लग्न व्हावे अशी घरातल्यांची इच्छा आहे. पण अनेकदा समजवूनही अजिंक्य त्याच्या स्वप्नांशी तडजोड करायला तयार नाहीये. तर अजिंक्यच्या पूर्णपणे विरुद्ध स्वभावाची शीतल आहे. तिच्या आयुष्यात कसलेही ध्येय नाहीये. सतत हसत खेळत जगणारी शितल घरातील सगळ्यांची लाडकी आहे. ती घरातल्यांसाठी खूप भाग्यवान असल्याचे तिच्या घरातले मानतात. त्यामुळे तिने लग्न करून आपल्यापासून दूर न जाता आपल्या गावाच्याच जवळपास राहावे असेच तिच्या घरातल्यांना वाटते. ती अतिशय सुंदर असल्याने गावातली सगळी मुले तिच्या मागे-पुढे फिरतात. पण शीतल त्यांच्याकडे लक्षदेखील देत नाही. दुसरीकडे शीतल आणि अजिंक्यच अजिबात पटत नाही. पण हळूहळू ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांची हीच प्रेमकथा प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.