Tharala Tar Mag Trp New Records: सध्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी 'स्टार प्रवाह'वरील मालिका 'ठरलं तर मग'नं नुकताच एक मोठा आणि निर्णायक टप्पा गाठला आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या भागांमध्ये 'वात्सल्य आश्रम मर्डर केस'चा सत्याच्या बाजूने निकाल लागला आणि अर्जुनला यश मिळालं. मालिकेत जे प्रेक्षकांना अपेक्षित होतं तेच घडलं. मालिकेतील दोन्ही प्रमुख खलनायिका साक्षी, प्रिया यांना शिक्षा सुनावण्यात आली आणि मधुभाऊ निर्दोष सुटले. या संपूर्ण ट्रॅकमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम मालिकेनं केलं. नाट्यमय वळणामुळं मालिकेनं टीआरपीच्या शिखरावर झेप घेत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. मालिकेत 'अर्जून'ची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशाली भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'ठरलं तर मग' मालिकेने नुकतीच एक मोठी कामगिरी गाठली असून ९.१ TVR आणि २.७ कोटी प्रेक्षक हे मोठं यश मिळवलं आहे. या यशानंतर अमित भानुशालीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं," खूप खूप आभार... 'ठरलं तर मग'च्या या अभूतपूर्व यशामागे आमच्या संपूर्ण टीमचं कष्ट तर आहेच, पण सगळ्यात मोठं योगदान आहे ते आमच्या प्रेक्षकांच्या प्रेमाचं आणि पाठिंब्याचं. ९.१ TVR आणि २.७ कोटी प्रेक्षक… हे सर्व फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे! तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्यावर राहू द्या. आम्ही आज इथे आहोत तुमच्यामुळेच आणि पुढचं यशही तुमच्यासोबतच मिळवायचं आहे!" या शब्दात अमितनं आनंद व्यक्त केला आहे. अमितची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून चाहत्यांनीही त्याच्या पोस्टवर भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे.
'वात्सल्य आश्रम मर्डर केस' निकालानंतरही मालिकेत मोठे ट्विस्ट येत आहेत. वात्सल्य आश्रम पुन्हा उघडला गेला आहे. सायलीच तन्वी असल्याचे सत्य आता लवकरच मधुभाऊंना समजणार आहे. प्रतिमाचा भूतकाळ तिला आठवणार आहे. त्यामुळे 'ठरलं तर मग' मालिकेतील पुढे येणारे नवे ट्विस्ट आणि टर्न्स पाहण्यासाठी प्रेक्षकांना आता आणखी उत्सुकता लागली आहे.