तेजस्विनी पंडितची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. त्या ६८ वर्षांच्या होत्या. प्रकृती बिघडल्याने गेल्या ३-४ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील का खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण अखेर आज त्यांची दुपारी ३-४च्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आईच्या छत्र हरपल्याने तेजस्विनीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
"नमस्कार, कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की मनमुराद जगणारी आणि दिसखुलास हसणारी आमची आई तसेच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती चांदेकर पंडित यांचे वयाच्या ६९व्या वर्षी आज १६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे. त्यांचे अंत्यसंस्कार उद्या १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी पुणे येथे होणार आहेत", असं तेजस्विनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.
ज्योती चांदेकर यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली होती. २०० हून अधिक पुरस्कार त्यांनी नावावर केले होते. सध्या त्या ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. आईच्याच पावलावर पाऊल ठेवत तेजस्विनी पंडित हिनेदेखील अभिनयात करिअर करायचं ठरवलं. ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.