‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील नट्टू काका अर्थात घनश्याम नायक यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक घशाचा त्रास होऊ लागल्याने त्यांची प्रकृती बिघडली़ सगळे रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या घशाची एक शस्रक्रिया केली जाणार असल्याचे कळतेय.टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, घनश्याम नायक यांच्या घशात गाठ आढळली आहे. यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होऊ लागला. अशात त्यांची प्रकृती बिघडली. यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.
नट्टू काका गेल्या काही एपिसोडमध्ये दिसलेले नाहीत. होय, लॉकडाऊननंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे शूटींग सुरु झाले. मात्र कोरोनामुळे ते शूटींगमध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. अर्थात हायकोर्टाच्या निर्णयानंतर 65 वर्षांवरील कलाकारही शूटींगमध्ये भाग घेऊ शकणार असल्याने नट्टू काकाच्या शूटींगवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र आता त्यांच्या आजाराने डोके वर काढल्याने नट्टू काका आणखी काही दिवस मालिकेत दिसणार नाहीत.
तूर्तास नट्टू काका लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा मालिकेत परतावेत यासाठी चाहत्यांसह सिरीयलमधील टीमही प्रार्थना करत आहे.‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेल्या 13 वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे आणि तेव्हापासून घनश्याम नायक हेही या शोचा भाग आहेत. यादरम्यान संजय लीला भन्साळी आणि करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसनेही त्यांना रोल ऑफर केले होते. मात्र त्यांनी त्यास नकार दिला. कारण नट्टू काका ही त्यांची सर्वाधिक आवडीची भूमिका आहे.
चेह-यावर मेकअप लागलेला असतानाच मला मरण यावे....शेवटच्या श्वासापर्यंत मला काम करायचे आहे. मी जिवंत आहे, तोपर्यंत मी काम करत राहिल. चेह-यावर मेकअप लागलेला असतानाच मला मरण यावे, अशी माझी शेवटची इच्छा आहे, असे अलीकडे एका मालिकेत ते म्हणाले होते. मी आयुष्यभर संघर्ष केला. मात्र वयाच्या 63 व्या मला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मिळाली. 350 सिनेमांमध्ये काम करूनही मला ती ओळख मिळाली नाही, जी या मालिकेने दिली, असेही ते म्हणाले होते़