‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ओमने दावा केला की, ढिंचॅक पूजा त्याची खूप मोठी भक्त आहे. एवढेच नव्हे तर त्याने हादेखील दावा केला की, पूजाचे ‘सेल्फी मैंने ले ली आज’ हे प्रसिद्ध गाणे मीच कंम्पोज केले आहे. मुलाखतीत स्वामी ओमने म्हटले की, ‘ढिंचॅक पूजा माझ्याकडे आली होती. तिला माहिती आहे की, मी खूप मोठा तांत्रिक आहे. तिला सुपरहिट व्हायचे होते म्हणूनच ती माझ्याकडे आली होती. तिचे जे ‘सेल्फी मैंने ले ली आज’ हे सुपरहिट गाणे आहे, ते मीच लिहिले आहे. तेव्हा मी गाणे लिहिण्याच्या मूडमध्ये होता. त्यावेळी ती माझ्यासोबत सेल्फी घेत होती, तेव्हा मी तिला यावरूनच गाणे लिहून दिले.’
स्वामी ओमला प्रसिद्धीझोतात राहण्याचे सर्व फंडे माहिती आहेत. त्यामुळेच त्याने पूजाबद्दल अशाप्रकारचे विधान केले असावे, अशी चर्चा आहे. गेल्यावर्षी स्वामी ओमने सलमान खानबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती. स्वामी ओमवर न्यायालयातही बरीचशी प्रकरणे सुरू असून, त्यात एक चोरीचा गुन्हा आहे. भावानेच त्याच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. बिग बॉस ११ बद्दल बोलताना स्वामी ओमने म्हटले की, मी माझ्या तीन मुलींना बिग बॉसच्या घरात पाठविले आहे. त्यात एक सपना चौधरी, दुसरी ढिंचॅक पूजा अन् तिसरी शिवानी दुर्गा आहे.
बिग बॉसच्या घरात ढिंचॅक पूजाच्या परफॉर्मन्सविषयी सांगायचे झाल्यास ती घरात फार काही विशेष करताना दिसत नाही. घरात प्रवेश करताच तिची मैत्री घरातील रॅपर आकाश ददलानी याच्याबरोबर झाली होती. त्याचबरोबर हितेन तेजवानी, शिल्पा शिंदे, हिना खान यांच्यासोबत तिचा फारसा दोस्ताना नसल्याचे दिसून येत आहे.