Join us
Daily Top 2Weekly Top 5

​एक था राजा एक थी राणी या मालिकेत होणार सुयश रायचा प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 18:08 IST

एक था राजा, एक थी राणी या मालिकेत प्रेक्षकांना आता एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सुयश ...

एक था राजा, एक थी राणी या मालिकेत प्रेक्षकांना आता एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सुयश रायची लवकरच एंट्री होणार आहे. सुयशने नुकतेच अभिनेत्री किश्वर मर्चंटसोबत लग्न केले. किश्वर आणि सुयशच्या लग्नाची मीडियात बरीच चर्चा झाली होती. किश्वरने तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलासोबत लग्न केल्याने सोशल मीडियावर तिची खिल्लीदेखील उडवण्यात आली होती. सुयश आणि किश्वरच्या लग्नानंतर सुयशची ही पहिली मालिका असणार आहे. सुयशला नकारात्मक भूमिका साकारायला अधिक आवडतात. आता तो या मालिकेत एका पोलीस निरीक्षकाची भूमिका साकारत आहे. तो राजा आणि राणीच्या आयुष्यात समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. या मालिकेत सुयश पोलिसाच्या भूमिकेत असल्याने खूपच आनंदित आहे. कारण त्याची आई पोलिस दलातच होती. त्यामुळे या मालिकेमुळे त्याच्या आईची इच्छा पूर्ण झाली आहे. त्याच्या भूमिकेविषयी माहिती देताना तो सांगतो, "मी या मालिकेत विजय देशमुख ही भूमिका साकारत आहे. आतापर्यंत मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका मला अधिक जवळची वाटते. कारण मी या मालिकेत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. माझी आई पोलिस दलात होती आणि मीदेखील पोलिस अधिकारी व्हावे अशी तिची इच्छा होती. पण मला अभिनयाचे वेड असल्याने मी त्या क्षेत्राकडे वळालो नाही. पण या भूमिकेमुळे मी माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करत आहे. अभिनेता होण्याचा हाच एक मोठा फायदा असतो की तुम्हाला एकाच आयुष्यात अनेक भूमिका पार पाडता येतात."