Join us

वादळामुळे पहरेदार पिया कीचे चित्रीकरण झाले विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 14:32 IST

पहरेदार पिया की या मालिकेचे चित्रीकरण मंडावा, राजस्थानच्या वाळवंटी भागात सुरू आहे. सध्या राजस्थामध्ये प्रचंड उन्हाळा आहे. उन्हात आऊटडोर ...

पहरेदार पिया की या मालिकेचे चित्रीकरण मंडावा, राजस्थानच्या वाळवंटी भागात सुरू आहे. सध्या राजस्थामध्ये प्रचंड उन्हाळा आहे. उन्हात आऊटडोर चित्रीकरण करणे हे मालिकेच्या संपूर्ण टीमसाठी खूप कठीण असते आणि त्यातही राजस्थानसारख्या उन्हाळी भागात चित्रीकरण करायचे म्हटले तर संपूर्ण टीमच्या नाकी नऊ येते. राजस्थानच्या रणरणत्या उन्हामध्ये चित्रीकरण करणे हे पहरेदार पिया की या मालिकेच्या संपूर्ण टीमसाठी आव्हानात्मक आहे. प्रचंड उन्हामुळे चित्रीकरण करताना सगळ्यांनाच खूप त्रास होत आहे आणि त्यात अलीकडेच वाळूचे वादळ आल्यामुळे मालिकेच्या चित्रीकरणावर चांगलाच परिणाम झाला आहे. वाळूचे वादळ इतके भयानक होते की, त्यामुळे संपूर्ण सेटच खराब झाला आहे. मालिकेचा सेट पुन्हा बनवायला काही दिवसांचा कालावधी लावणार असल्याने या मालिकेचे चित्रीकरण काही काळासाठी लांबणीवर पडले आहे. वाळूचे वादळ सतत येत असल्याने मालिकेच्या टीमला चित्रीकरण रद्द करावे लागले आहे. वादळाची तीव्रता इतकी होती की वादळामुळे टीमला संपूर्ण दिवस चित्रीकरण करताच आले नाही. या वादळामुळे कोणाला दुखापत होऊ नये अथवा कसलेही नुकसान होऊ नये यासाठी टीममधील मंडळींना त्या जागेवरून दुसरीकडे नेण्यात आले. खरे तर वादळ काहीच वेळांसाठी होते. पण होळीच्या दृश्यासाठी तयार करण्यात आलेला सेट यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. हा सेट तयार करायला टीमला अनेक तासांचा वेळ लागला होता. पहरेदार पिया की या मालिकेत प्रेक्षकांना नऊ वर्षांचा मुलगा रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया म्हणजेच तेजस्वी वायंगणकर यांच्या असामान्य विवाहाची कथा पाहायला मिळणार आहे. दिया आपल्या स्वप्नांचे बलिदान देऊन रतनच्या रक्षणार्थ त्याच्याशी विवाह करणार आहे.