Join us
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच गोष्ट मोडलेल्या लग्नाची आणि जडलेल्या प्रेमाची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 17:24 IST

'नवे पर्व युवा सर्व' हे ब्रीद वाक्य घेऊन झी युवा या वाहिनीने नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम मालिका आणल्या आणि ...

'नवे पर्व युवा सर्व' हे ब्रीद वाक्य घेऊन झी युवा या वाहिनीने नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम मालिका आणल्या आणि प्रेक्षकांनी त्या मालिकांना मनापासून पसंती सुद्धा दिली. या मालिकांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्या. प्रेम ही भावनाच अशी आहे, ज्यापासून कोणीही दूर राहू शकलेला नाही. सध्या व्हॅलेंटाइन्स डे’च्या निमित्ताने सर्वत्र प्रेमाचे वारे वाहत आहेत. प्रेमाच्या या महिन्यात झी युवा ही वाहिनी, आपल्या प्रेक्षकांसाठी अहमदनगर मध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' घेउन येत आहे. प्रेक्षक सहकुटुंब ही मालिका पाहू शकतील आणि त्यात घडणाऱ्या रोजच्या आयुष्यातील गंमतीजंमतींचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकतील. लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी कासार आणि नवोदित पुष्कर शरद या मालिकेच्या माध्यमातून झी युवावर येत आहेत.  ही मालिका १९ फेब्रुवारीपासून रसिकांना पाहायला मिळणार आहे.अहमदनगर शहरात राहत असलेल्या पूर्वा बोराडे आणि पराग निकम यांच्या मोडलेल्या लग्नाची पण त्याचबरोबर निरागस पणे एकमेकांवर जडलेल्या प्रेमाची ही गोष्ट आहे. मालिकेची नायिका पूर्वा, ही महाराष्ट्रातील असंख्य मुलींचं प्रतिनिधित्व करते. आपल्या माणसांची मन सांभाळत, उच्च शिक्षणाची इच्छा पूर्ण करत असलेली पूर्वा आणि प्राध्यापक असेलला पराग साधा जरी असला, तरीही विचार करण्याची त्याची पद्धत त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. एका शहरात राहणाऱ्या या दोन अपरिचित तरुणांचं एकमेकांसोबत ठरलेलं लग्न मोडतं. त्यांनतर त्यांच्यात झालेली मैत्री आणि जडलेलं प्रेम हा प्रवास यात आहे. हलक्या फुलक्या विनोदी अंगाने जाणारी ही प्रेम कथा प्रेक्षकांना निश्चितच आवडेल.बोराडे आणि निकम या दोन कुटुंबांमध्ये ही कथा गुंफली गेली आहे.बोराडे कुटुंबात दिलीप घारे, वैशाली गोस्वामी, सौरभ कुलकर्णी, हर्षदा बावसार, राजेश दुर्गे, स्नेहा माजगांवकर, अश्विनी भालेकर,राहुल सुराना,पार्थ शिरोडकर,धनंजय सरदेशपांडे,नितीन जावळे, मिताली जोशी हे पहायला मिळतील आणि निकम कुटुंबामध्ये श्रेणिक शिंगवी,शोभा दांडगे,मोनिका बनकर,श्वेता मांडे,श्रीकृष्ण सुतावणे,गार्गी फुले,प्रयाग वारपे,चंद्रकांत जाधव, प्रतिभा दाते, समृद्धी दुर्गे, शार्दूल सराफ ही मंडळी आहेत. त्याच प्रमाणे अमृता तोडरमल, निकिता कुलकर्णी, अमित खताळ, अजिंक्य सोनावणे, पी. डी. कुलकर्णी आणि कमलेश जाधव हे सुद्धा वेगळ्या भूमिकेत दिसतील .लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे या मालिकेमध्ये एका आगळ्या वेगळ्या आणि सकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.झी युवा आणि झी टॉकीज चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांना 'कट्टी बट्टी' या नवीन मालिकेबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले," खरा महाराष्ट्र हा गावच्या मातीत लपलेला आहे. गावाकडची भाषा संस्कृती, चालीरीती यांची एक वेगळी मजा आहे. हीच मजा आम्ही 'कट्टी बट्टी 'या मालिकेतून छोट्या पडद्यावर आणली आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच झी युवा मध्य महाराष्ट्रात जाऊन या दैनंदिन मालिकेचं शूटिंग करतं आहे, इतकंच नाही तर अहमदनगर व औरंगाबाद शहरांमधील स्थानिक कलाकारांना या मालिकेच्या निमित्ताने व्यासपीठही उपलब्ध करून दिले आहे.