Join us

जाब विचारताच भडकला रोमिओ, रेल्वे स्थानकावर टीव्ही अभिनेत्रीला केली मारहाण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 14:11 IST

होय, रेल्वे स्थानकावर एका भामट्याने तिला सर्वांसमोर मारहाण केली.

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणानंतर शाहरूख शेखला अटक करण्यात आली आहे.

टीव्ही अभिनेत्री आणि स्प्लिटविला फेम हर्षिता कश्यप हिला एका धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. होय, रेल्वे स्थानकावर   एका भामट्याने तिला सर्वांसमोर मारहाण केली.हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना आपबीती सांगितली. चरनी रोड रेल्वे स्थानकावर हर्षिता व तिची एनआरआय मैत्रिण दोघेही तिकिटाच्या रांगेत उभे असताना ही घटना घडली. हर्षिताने सांगितल्यानुसार, एक काम संपवून हर्षिता व तिची मैत्रिण पाला या दोघी ट्रेनचे तिकिट काढण्यासाठी रांगेत उभ्या होत्या. याच दरम्यान एक भामटा या दोघींकडे एकटक बघत होता.

सुरुवातीला हर्षिता व पालाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण नंतर तो त्या दोघींचा पाठलाग करू लागला. पाठलाग करत तो रेल्वे स्थानकाच्या पाय-यांपर्यंत आला. अखेर हर्षिताने त्याला हटकले. काय बघतोय आणि  पाठलाग का करतोय? असा जाब तिने त्याला विचारला. जाब विचारताच हा भामटा संतापला. बघितले तर काय बिघडले, असा उलट सवाल त्याने केला. यावरून वाद वाढला आणि याचदरम्यान त्या भामट्याने पालाला थप्पड लागवली. मैत्रिणीला मारहाण होताना बघून हर्षिताने त्याला विरोध केला असता  त्या भामट्याने तिलाही मारहाण केली.

सुदैवाने काही क्षणात पोलिस आलेत आणि त्यांनी दोघींची सुटका केली. या आरोपीचे नाव शाहरूख शेख असल्याचे कळतेय. या मारहाणीत हर्षिता किरकोळ जखमी झाली आहे. तिच्या जखमांचे फोटोही व्हायरल झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणानंतर शाहरूख शेखला अटक करण्यात आली आहे. तो वरळीच्या मरियप्पा नगरात राहणारा असून एका सुप्रसिद्ध नाईट क्लबमध्ये कामाला आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजन