टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला काही दिवसांपूर्वीच कॅन्सरचं निदान झालं आहे. सध्या दीपिका यावर उपचार घेत आहे. लिव्हरला असलेला ट्युमर कॅन्सरचा असल्याचं समजल्यानंतर अभिनेत्री आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या दीपिकाची भेट घेण्यासाठी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या घरी पोहोचली. याबाबत दीपिकाने पोस्ट शेअर केली आहे.
दीपिकाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सोनाली कुलकर्णीसोबतचा फोटो शेअर केला आहे. "KV1 देहू रोड या शाळेपासून ते आत्तापर्यंत... काही नाती बदलत नाहीत. काळजी, प्रेम, आपुलकी बदलत नाही. आम्ही सारख्या भेटत नसलो तरीदेखील आमच्यातलं नातं तसंच आहे. थँक्यू आणि लव्ह यू सोनाली", असं कॅप्शन दीपिकाने या पोस्टला दिलं आहे. दीपिका आणि सोनाली एकाच शाळेत शिकल्या आहेत.
दरम्यान, दीपिकाला सुरुवातीला लिव्हर ट्युमरचं निदान झालं होतं. सर्जरी करून हे ट्युमर काढण्यात आलं आहे. त्यानंतर दीपिकाला स्टेज २ कॅन्सर असल्याचं समजलं होतं. सध्या अभिनेत्री यावर उपचार घेत असून चाहत्यांना याबाबत अपडेट्स देत असते.