Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्वेता तिवारीची बहीण अर्पिताच्या हत्येप्रकरणी एकाला अटक, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 16:30 IST

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची बहीण अर्पिता तिवारीच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची बहीण अर्पिता तिवारीच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासाकरिता अमित हाजरा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात अमित हाजराच्या काही संशयास्पद गोष्टी पोलिसांना आढळून आल्या, त्याच आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासात अर्पिता आणि अमितमध्ये फेसबुक चॅटिंग झाल्याचे समोर आले. हे चॅट अर्पिताच्या हत्येच्या चार दिवस अगोदर करण्यात आले होते. दरम्यान, अमितला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. गेल्या महिन्याच्या १० तारखेला अर्पिता तिवारीची हत्या करण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, अमित अर्पितासोबत रिलेशनशिप पुढे नेऊ इच्छित होता, तर अर्पिताचे अगोदरच बॉयफ्रेंड पंकज जाधव याच्याशी संबंध होते. अर्पिता गेल्या आठ वर्षांपासून पंकज जाधवसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र तिला त्याच्याशी ब्रेकअप करायचे होते. असे म्हटले जात आहे की, अर्पिताला पंकजसोबत लग्न करायचे होते, परंतु पंकज यासाठी तयार नसल्यानेच ती त्याच्यासोबत ब्रेकअप करू इच्छित होती. त्यातच जेव्हा ही बाब अमितला कळून चुकली तेव्हा त्याने अर्पिताशी जवळिकता वाढविण्यास सुरुवात केली होती.  अर्पिता इव्हेंटमध्ये परफॉर्मन्स करीत असे. तर तिचा बॉयफ्रेंड अ‍ॅनिमेशन एक्सपर्ट आहे. दरम्यान, अर्पिताची बहीण श्वेता तिवारीने अमितच्या अटकेवर म्हटले की, ‘मला असे वाटते की, अमितसोबत आणखी काही लोक या हत्येत सहभागी असावेत. आम्हाला आनंद आहे की, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तातडीने अमितला अटक केली. परंतु या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणे अजून बाकी असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करायला हवा. पोलीस आरोपींपर्यंत पोहचण्यात यशस्वी होतील याची आम्हाला खात्री आहे.’