Join us  

अहो, शेवंता मादक होती, सुंदर होती. पण ती गरीब असल्यामुळे तिला पैशाची हाव होती. पम्मी तशी नाहीये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 2:29 PM

अपूर्वा नेमळेकरने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही 'रात्रीस खेळ चाले 2' या मालिकेमुळेच मिळाली.

आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय'मधून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीस आली आहे. सोशल मीडियावर देखील प्रेक्षकांनी या प्रोमोला उदंड प्रतिसाद दिला. पण काही नेटिझन्सनी अपूर्वाला या प्रोमोवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अपूर्वाने शांत न बसता त्या ट्रॉलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. अपूर्वाला पाहताच  रसिक  अपूर्वाच्या शेवंता या व्यक्तिरेखेला अजूनही विसरू शकले नाही आहेत पण आता त्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे अपूर्वाच्या पम्मी या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घ्यायची.तिच्या पम्मी या नवीन व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली, “पम्मी आणि शेवंता यांची मी तुलनाच नाही करू शकत. कारण शेवंता या व्यक्तिरेखेचं एक उद्दिष्ट होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी नाईक कुटुंबाला तिच्या तालावर नाचवत होती. 

पण पम्मी हि एक विनोदी व्यक्तिरेखा आहे. तिच्या पासून कोणालाच धोका नाहीये. पम्मी हि तिच्या विश्वात जगणारी आहे. सगळ्यांचं छान व्हावं असं तिला वाटतं आणि त्यासाठी ती सगळ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असते. शेवंता तशी नव्हती. शेवंता मादक होती, सुंदर होती. पण ती गरीब असल्यामुळे तिला पैशाची हाव होती. पम्मी तशी नाहीये, पम्मी खूप श्रीमंत आहे. तिचं लग्न झालंय आणि तिचा नवरा दुबईमध्ये असतो. तिच्या कडे सर्व काही आहे. ती अभिनय क्षेत्रात लवकरच खूप मोठं नाव करणार आहे असं तिला वाटतं आणि सगळ्यांना मदत करण्याच्या नादात ती या मालिकेत गम्मत आणणार आहे.”

 

अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही 'रात्रीस खेळ चाले 2' या मालिकेमुळेच मिळाली.

 

तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

टॅग्स :अपूर्वा नेमळेकररात्रीस खेळ चाले