शौर्य गाथा अभिमानाची या कार्यक्रमाचे नवे पर्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 17:47 IST
एखाद्या गुन्ह्याचा शोध घेताना सर्वप्रथम गुन्हेगार कोण? हे समजणे जेवढे महत्त्वाचे असते. तेवढेच एखादा गुन्हा घडल्यानंतर तो गुन्हा दाखल ...
शौर्य गाथा अभिमानाची या कार्यक्रमाचे नवे पर्व
एखाद्या गुन्ह्याचा शोध घेताना सर्वप्रथम गुन्हेगार कोण? हे समजणे जेवढे महत्त्वाचे असते. तेवढेच एखादा गुन्हा घडल्यानंतर तो गुन्हा दाखल करणे, पंचनामा करणे, साक्षीदारांच्या साक्षी घेणे आणि अनेक बारीकसारीक तपशील न्यायालयापुढे नीट मांडणे, त्या अनुषंगाने कागदपत्रे सादर करणे हे खूप महत्त्वाचे असते. शौर्य गाथा अभिमानाची या मालिकेत प्रेक्षकांना कायदा आणि सुव्यवस्था नक्की कशी असते आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र पोलीस कशाप्रकारे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गुन्ह्याची उकल करतात हे दाखवले गेले होते. आता शौर्य गाथा अभिमानाची या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू होणार आहे. पहिल्या पर्वात पोलिसांच्या रूपातील सूत्रधार स्वतः प्रेक्षकांना गुन्हा कसा घडला आणि पोलिसांनी शौर्याने गुन्ह्याची उकल कशी केली हे सांगत असे. त्याचसोबत शौर्य गाथा अभिमानाच्या मागील पर्वात अनेक महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीतील सत्य घटना दाखवण्यात आल्या होत्या. यामुळे अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या रंजक आणि खऱ्या घटनांमुळे प्रेक्षकांना पोलिसांचे खरे शौर्य समजले.शौर्य गाथा अभिमानाची या कार्यक्रमाच्या नव्या पर्वामध्ये केवळ मोठ्या शहरातील नव्हे तर त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शौर्यगाथांचासुद्धा समावेश केला जाणार आहे. या पर्वाच्या पहिल्याच भागात पुण्यातील एक कथा दाखवली जाणार आहे. तब्बल १० वर्षानंतर एका पित्याच्या विनंतीवरून मिलिंद गायकवाड या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याने एक जुनी केस पुन्हा ओपन केली आणि योग्य प्रकारे चौकशी करून गुन्हेगाऱ्याला गजाआड केले आणि त्यामुळे एका पित्याला न्याय मिळाला.शौर्य गाथा अभिमानाची या मालिकेचे निर्माते क्राईम पेट्रोल मालिका निर्माण करणारे लोटस एन्टरटेनमेंट टॉकीजचे विक्रम राय आणि भुवनेश श्रीवास्तव हे असून क्रिएटिव्ह दिग्दर्शक संजय झणकर आहेत आणि या मालिकेचे लेखन स्वप्नील महालिंग यांनी केले आहे.