Shashank Ketkar Turns 40: मराठी अभिनेता शशांक केतकर हा नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. या माध्यमावर त्याला बरेच जण फॉलो करतात. वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी, सेटवरचे किस्से तसेच समाजातल्या न पटणाऱ्या गोष्टींवर तो सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. नुकताच त्याने आपला ४०वा वाढदिवस साजरा केला आणि त्याचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करून एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
शशांकने त्याच्या वाढदिवसाचे काही फोटो एकत्र करून एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात त्याचे आई-वडील, पत्नी प्रियांका आणि त्याची दोन्ही मुले दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्याचे आई-वडील त्याला प्रेमाने घास भरवताना दिसले. या फोटोंमधून शशांकच्या कुटुंबातील जिव्हाळा दिसून आला.
हा व्हिडीओ शेअर करताना शशांकने लिहिले,"पोस्ट थोडी लेट आहे पण ग्रेट आहे! १५ सप्टेंबरला मी ४० चा झालो. शप्पथ सांगतो इतका समाधानी मी या आधी कधीच नव्हतो. ४० नुसतं म्हणायला हो… ही सगळी माझी माणसं आहेत आजूबाजूला, त्यामुळे २० चा झालोय असंही वाटतं नाही. उद्या अजून कितीही वय वाढलं तरी या सगळ्यांसाठी मला खंबीरपणे उभ रहायचंय, जे यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे शक्य होईल", असं त्यानं म्हटलं. शशांकच्या या पोस्टने त्याच्या चाहत्यांची मने जिंकली असून, अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शशांक केतकरने अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून शंशाक घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने 'पाहिले न मी तुला' 'सुखाच्या सरींनी मन हे बावरे' अशा काही मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. सध्या शशांक केतकर 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीची आहे.