बिग बॉस या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची सध्या जोरदार चर्चा आहे. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळे सिझन हिट गेले आहेत. त्यामुळे हा सिझन देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडणार अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. या कार्यक्रमाचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करणार असून या कार्यक्रमाच्या प्रोमोसाठी त्याने नुकतेच चित्रीकरण केले. या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये सेलिब्रेटी जोड्यांमध्ये हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे. कार्यक्रमाच्या प्रोमोवरूनच ही गोष्ट कळून येत आहे. आता या कार्यक्रमात कोणकोणते सेलिब्रेटी झळकणार याची चर्चा सध्या मीडियामध्ये रंगली आहे. छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता शालिन भनोट या कार्यक्रमात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.
शालिन त्याच्या अभिनयासोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याची पत्नी दलजीत कौरने त्याच्यावर काही वर्षांपूर्वी मारहाणीचा आरोप लावला होता. शालिन तिला मारहाण करायचा असे तिने पोलिसांना सांगितले होते. या सगळ्या विवादानंतर काहीच वर्षांत त्या दोघांनी घटस्फोट घेतला.
सात फेरे, कुलवधू, नागिन, सजदा तेरे प्यार मैं यांसारख्या मालिकांमध्ये शालिनने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसेच देवदूत, प्यारे मोहन यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील त्याने काम केले आहे. तो काही महिन्यांपूर्वी शेर ए पंजाबः महाराणा रंजीत सिंग या मालिकेत झळकला होता. पण गेल्या कित्येक दिवसांपासून तो छोट्या पडद्यापासून गायब आहे. तो लवकरच बिग बॉससोबत करार करणार असल्याचे म्हटले जात आहे. कुलवधू या मालिकेत दलजीतने त्याच्यासोबत काम केले होते. याच मालिकेच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी २००९ मध्ये लग्न केले. पण लग्नाच्या काहीच दिवसांत त्या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. शालिनने दलजीतने मारहाण केली असल्याचा आरोप दलजीतने लावला होता. त्या दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव जॉर्डन आहे. त्या दोघांचा घटस्फोट होऊन काही वर्षं झाले असून त्यांचा मुलगा शालिनसोबत राहातो.