Join us

'शाका लाका बूम बूम' फेम किंशुक वैद्यचा छळाचा आरोप, पुराव्यासह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 09:47 IST

Kinshuk Vaidya : हिंदी छोट्या पडद्यावरील अभिनेता किंशुक वैद्यने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनात घर केले आहे. त्याने बालकलाकार म्हणून 'शाका लाका बूम बूम'मध्ये काम केले आहे.

हिंदी छोट्या पडद्यावरील अभिनेता किंशुक वैद्य(Kinshuk Vaidya)ने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनात घर केले आहे. त्याने बालकलाकार म्हणून 'शाका लाका बूम बूम'मध्ये काम केले आहे. या भूमिकेतून तो घराघरात पोहचला आहे. दरम्यान त्याच्यासोबत एक घटना घडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अलिबागमधील काही स्थानिक लोकांकडून त्याचा छळ होत असल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे. याबाबत त्याने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नागावच्या सरपंचाने एका जमीन मालकाला कामावर घेतले असून ते लोक त्यांच्या गेटची तोडफोड करत असल्याचा आरोप अभिनेत्याने केला आहे.

किंशुक वैद्यने सांगितले की, 'माझ्याकडे नागावमध्ये वडिलोपार्जित मालमत्ता आहे, तिचे २०२२ मध्ये रिसॉर्टमध्ये रूपांतर झाले. आता गेल्या काही महिन्यांपासून काही स्थानिक रहिवासी त्रास देत आहेत. २५ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता नागावचे सरपंच निखिल मयेकर यांनी त्यांच्या एका मित्राला माझ्या स्टाफचे गेट तोडण्याचे आदेश दिले. ज्याला हे करण्यास सांगितले आहे तो लॅण्ड मुव्हरचा मालक आणि ऑपरेटर आहे.

किंशुक वैद्यचा आरोपकिंशुक वैद्यने सांगितले की, त्याच्याकडे घटनेचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आहेत. यानंतर त्याने अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून पुरावेही पोलिसांकडे सुपूर्द केले. अभिनेत्याचे म्हणणे आहे की अशा प्रकारे त्याचा छळ केला जात आहे कारण त्यांना एक रुंद रस्ता हवा आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे. जेव्हा अभिनेता आपल्या मालमत्तेतील थोडीफार जागा देईल. जे शक्य नाही.

किंशुक म्हणाला की, त्याचा देशाच्या कायदा आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्याला फक्त हा छळ थांबवायचा आहे. दुसरीकडे 'ईटाईम्स'ने सरपंच निखिल यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी हे सर्व खोटे असल्याचे सांगितले. किंशुकने स्थानिकांना त्रास दिल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ते याप्रकरणी दखल घेतील.