भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण झाले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनं युद्धविराम लागू झाला असला तरी पाकिस्तान सीमारेषेवरील कुरापती अजूनही सुरुच आहेत. सोमवारी रात्री काही पाकिस्तानी ड्रोन्स काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये घिरट्या घालताना दिसून आले. भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स सिस्टीमने (Air Defence System) तात्काळ हे ड्रोन (Drone Attack) हवेतच नष्ट केले. पाकिस्तान सीमा भागात तणाव आहे. जम्मूत राहणाऱ्या लोकांमध्ये भीती आहे. शाहीर शेख (Shaheer Sheikh) अभिनेत्याचंही कुटुंब जम्मूमध्ये असून त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
शाहीर शेख याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या कुटुंबाबद्दलची काळजी व्यक्त करत सैनिकांचे आभार मानलेत. शाहीर शेख यांची आई आणि बहीण सध्या जम्मूमध्ये आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर आणि सीमावर्ती भागांतील तणावामुळे शाहीरने अनेक रात्री झोप न लागल्याचा अनुभव शेअर केला. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तो म्हणतो, "मी आपल्या सशस्त्र दलांचा कायम ऋणी राहीन! माझी आई आणि बहीण सध्या जम्मूमध्ये आहेत आणि या परिस्थितीमुळे आम्ही अनेक रात्री जागे होतो. पण आपल्या सैन्याने ज्या पद्धतीने अचूकता, वेग आणि शौर्य दाखवले, ते खरंच कौतुकास्पद आहे".
शाहीर पुढे म्हणतो, "जेव्हा एखादा प्रिय व्यक्ती आघाडीवर असतो, तेव्हा त्याच्या कुटुंबाला काय सहन करावं लागतं, याची कल्पनाही न करता येईल. सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबांना माझा सलाम. युद्धभूमीवर आणि युद्धाबाहेर त्यांनी दाखवलेलं धाडस आपल्या देशाला आणि लोकांना सुरक्षित ठेवतं. या कठीण काळात ज्यांनी आपले प्रियजन गमावलेत, त्यांच्याप्रती माझी मनापासून संवेदना. जय हिंद!".
टेलिव्हिजन ते बॉलिवूड, शाहीर शेखचा प्रवासछोट्या पडद्यावर 'महाभारत'मधील अर्जुनच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले शाहीर शेख याने 'नव्या', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'ये रिश्ता है प्यार के' यांसारख्या मालिकांमध्ये अभिनय करून लोकप्रियता मिळवली आहे. सध्या तो ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रातही सक्रीय आहे. काही दिवसांपूर्वी तो अभिनेत्री क्रिती सनॉन हिच्यासोबत 'दो पत्ती' या सिनेमात झळकला होता.