छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता परेश गणंत्रा लवकरच एका मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची असून तो या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. बेलनवाली बहू ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना क्रिस्टर डिसूझा आणि धीरज सरणा यांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कलर्स या वाहिनीवर ही मालिका दाखवली जाणार आहे. या मालिकेत बेलनवाली बहू ही मुख्य भूमिका क्रिस्टल डिसूझा साकारत आहे. ती या मालिकेत रूपा अवस्थीची प्रमुख भूमिका साकारत असून धीरज सरना तिच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. धीरजने आजवर अभिनेता, निर्माता आणि लेखक अशा विविध भूमिका छोट्या पडद्यावर पार पाडल्या आहेत तर क्रिस्टल डिसूझाने तिच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पण तिने कधीच कोणत्या कॉमेडी मालिकेत काम केलेले नाहीये. त्यामुळे या मालिकेत काम करण्याचा क्रिस्टलचा अनुभव खूपच वेगळा आहे. या मालिकेत परेश प्रेक्षकांना मालिका सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी दिसणार असल्याचे कळतेय. परेश या मालिकेचा भाग असणार असल्याचे त्याने कबूल केले असले तरी या मालिकेत तो कोणती भूमिका साकारणार याविषयी त्याने मौन राखणेच पसंत केले आहे. परेशने आजवर खूपच चांगले कॉमिक रोल साकारले आहेत. त्यामुळे या मालिकेद्वारे देखील तो प्रेक्षकांना खळखळून हसवणार असल्याचे म्हटले जात आहे.
परेशने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. एक महल हो सपनों का, बा बहू और बेबी, सजन रे झुट मत बोलो यांसारख्या मालिकांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. तो नुकताच चिडिया घर या मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने साकारलेली घोटकची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. याशिवाय त्याने कॉमेडी सर्कसच्या अनेक सिझनमध्ये काम केले आहे. तसेच द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात देखील तो झळकला होता. वेलकम, नो एंट्री, बोल बच्चन, रावडी राठोड यांसारख्या चित्रपटात देखील त्याने काम केले आहे.
Also Read : क्रिस्टल डिसूझा बनली बेलनवाली बहू
परेश गणंत्रा झळकणार बेलनवाली बहू या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 17:06 IST