पोरस या मालिकेत लक्ष लालवाणी प्रमुख भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 11:11 IST
लक्ष लालवाणीने आतापर्यंत रोडिज, अधुरी कहानी हमारी, परदेस में है मेरा दिल यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. परदेस में ...
पोरस या मालिकेत लक्ष लालवाणी प्रमुख भूमिकेत
लक्ष लालवाणीने आतापर्यंत रोडिज, अधुरी कहानी हमारी, परदेस में है मेरा दिल यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. परदेस में है मेरा दिल या मालिकेत त्याने साकारलेली वीर मेहरा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आता लक्षची पोरस या मालिकेत एंट्री होणार आहे. पोरस ही बिग बजेट मालिका असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेच्या निर्मितीसाठी जवळजवळ 500 कोटी खर्च केले जात आहेत. ही मालिका अतिशय भव्य-दिव्य असणार आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकार देखील तितकेच ताकदीचे असावेत यासाठी मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. पोरसची भूमिका साकारण्यासाठी छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार उत्सुक होते. अनेकांनी प्रोडक्शन हाऊसशी संपर्क साधून या भूमिकेसाठी ऑडिशन देण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. पण या भूमिकेसाठी लक्ष लालवाणीच योग्य आहे अशी मालिकेच्या टीमची खात्री असल्याने या भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. पोरस या मालिकेची कथा ख्रिस्तपूर्व 326च्या काळातील आहे. त्यामुळे या प्राचीन काळातील वैभव उभे करण्यासाठी आणि तो काळ जिवंत करण्यासाठी अगदी छोट्यातील छोट्या गोष्टीकडे देखील बारकाईने लक्ष दिले जात आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्यास लक्ष खूपच उत्सुक आहे. तो सांगतो, पोरसचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. ही व्यक्तिरेखा साकारायला खूपच मजा येणार आहे. पोरसची व्यक्तिरेखा साकारायला मिळत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. मला या मालिकेद्वारे खूपच मोठी संधी मिळाली आहे. या मालिकेसाठी अनेक गोष्टींचे आम्हाला प्रशिक्षण दिले जात आहे. ही मालिका अतिशय भव्य असल्याने या मालिकेचे चित्रीकरण सुरू होण्याची मी उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहे.