Join us  

'प्रत्येक रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाल्यामुळे ही दुसरी लाट आली?', जुई गडकरीने व्यक्त केला तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 5:57 PM

मॉलमध्ये प्रवेशासाठी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केल्यावरुन अभिनेत्री जुई गडकरीने संताप व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मॉलमध्ये प्रवेशासाठी कोव्हिडचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे. या नियमावर आता अभिनेत्री जुई गडकरीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्याचे जांभळी मार्केट आणि बेस्टच्या तुडुंब भरलेल्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट द्यायचा? असा सवालही जुईने उपस्थित केला आहे. फेसबुकवर आपला राग व्यक्त करत तिने गर्दीचे काही फोटो शेअर केले आहेत. प्रत्येक रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाले म्हणून ही दुसरी लाट आली आहे?” असा गंभीर आरोपही जुईने केला आहे.

जुई गडकरीने फेसबुकवर पोस्ट शेअर करत प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत. ती म्हणाली की, कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट मॉलमध्ये प्रवेशासाठी बंधनकारक. आणि ठाण्याच्या जांभळीच्या मार्केटमध्ये जायला कोणता रिपोर्ट? बेस्टच्या तुडुंब भरुन जाणाऱ्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट? परवाच कर्जतजवळच्या अंकल्स किचनबाहेर दोनशेपेक्षा जास्त गाड्या लागल्या होत्या आणि जोरदार लग्न सुरु होता. मग ५० माणसांचा नियम कुठे गेला?

पुढे ती म्हणाली की,आजही काही मोठ्या युनिव्हर्सिटीज (पारुल युनिव्हर्सिटी) कॉन्व्होकेशन करत आहेत, ४५०० जणांसह, नियम करताय तर सगळीगडे सारखे करा. मॉलमध्ये लोक निदान एकमेकांना चिकटून तरी बसत नाहीत. तरी टेस्ट बंधनकारक आणि बेस्ट बसेसमध्ये जवळजवळ एकमेकांच्या मांडीत बसतात.

परवा माझ्या एका मैत्रिणीचा डिलिव्हरी आधी कोरोनाची टेस्ट केली आणि तो दुर्दैवाने पॉझिटिव्ह आली. तिचे सी सेक्शन करावे लागले वेगळ्याच हॉस्पिटलला. कारण तिला ज्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी नेले होते, त्यांनी तिला दाखल करण्यास नकार दिला. विनोदी गोष्ट म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्ण असूनही तिला बाळाला स्तनपान करु दिले. बाळ तिच्यापासून अवघ्या पाच फुटांवर ठेवले होतं. ती असिम्पटमॅटिक होती. त्यांना भरमसाठ बिल भरावे लागले, अशी तक्रार जुईने फेसबुक पोस्टमधून केली.

नक्की काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही. कोरोना खरंच आहे की आता प्रत्येक रुग्णामागे दीड लाख मिळत होते, ते बंद झाले म्हणून ही दुसरी लाट आली आहे?, असा गंभीर सवालही जुईने उपस्थित केला.

टॅग्स :जुई गडकरीबिग बॉस मराठी