कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' (Aai Tulja Bhavani Serial) मालिकेत देवीचे बालरूप जगदंबा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. साडेतीन वर्षाच्या विहा सदगीर या अभिनेत्रीने तिच्या बाललीलांनी प्रेक्षकांना देवीचे हे तेजस्वी मोहक लोभस बालरूप गेले महिनाभर साकारले. आता मालिकेतली ही जगदंबा थोडी मोठी झाली असून आई तुळजाभवानीकडून प्रशिक्षण घेऊन सज्ज झाली. बाल जगदंबा अवघ्या सहाव्या वर्षी सातारचा कंदी पेढा म्हणून लोकप्रिय असलेली बालकलाकार वेदांती भोसले (Vedanti Bhosale) साकारणार आहे. खट्याळ, खोडकर आणि प्रसंगी रौद्रावतार धारण करणारी वेदांती ही भूमिका साकारणार याची वेगळीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असून त्याची विशेष चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
आई तुळजाभवानी मालिकेतील कथानक आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. मोहच्या मायावी मोहजालाचा विनाश तुळजाभवानीच्या कृपेने झाल्यानंतर गावकऱ्यांच्या समोर आता एक नवीन भयप्रद संकट उभं ठाकणार आहे आणि ते म्हणजे 'मद'. स्वतःच्या गुर्मीत मस्तीत गावात प्रवेश करणारा अहंकारी ‘मद’ गुलामांच्या पाठीवर बसून येतो. त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हसू, त्याचा आसुड गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करतो.
मदराजाचा फटका.. आता नाही सुटका.. म्हणणाऱ्या मदची भीती गावकऱ्यांच्या डोळ्यात दिसून येते आहे नक्की कोण आहे हा मद? त्याचा आणि आई तुळजाभवानीचा सामना कधी होणार ? या अहंकारी षड्रिपूला पाठवण्यामागची महिषासुराची योजना काय, योगनिद्रेत असलेल्या तुळजाचे हरण मद कसे करणार, त्यासाठी देवीचे बालरूप जगदंबाला अंकित केले जाणार का? तुळजाभवानी देवीच्या अनुपस्थितीत जगदंबा त्याचा कसा पराभव करणार हे जाणून घेण्यासाठी मालिका पाहावी लागेल. आई तुळजाभवानीमध्ये मोहच्या विनाशानंतर आता मदच्या अन्यायाला वठणीवर आणण्यासाठी बाल जगदंबा सज्ज होणार आहे. ही लढाई केवळ एका गावाच्या नव्हे, तर श्रद्धा आणि अन्याय यामधील संघर्षाची, देवीने भक्तांना परिस्थतीशी झुंजण्याचे बळ देण्याची, आई तुळजाभवानीच्या अनोख्या भक्त कल्याणाची ठरणार आहे.