Join us

सरस्वती फेम तितिक्षा तावडेला आहे 'हा' छंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 14:34 IST

कलर्स मराठीवरील सरस्वती मालिका सध्या प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेत सरस्वतीची भूमिका साकारणारी तितिक्षा तावडेने तर प्रेक्षकांचे ...

कलर्स मराठीवरील सरस्वती मालिका सध्या प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेत सरस्वतीची भूमिका साकारणारी तितिक्षा तावडेने तर प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तसेच या मालिकेतील राघव, देविका या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत.कोणत्याही मालिकेच्या शुटिंगसाठी कलाकार मालिकेच्या सेटवर दिवसातील दहा-बारा तास असतात. त्यामुळे हा सेटच त्या कलाकारांचे दुसरे घर बनते. या सगळ्यामध्ये आपले छंद जोपासणे, नातेवाईकांना भेटणे, वेळात वेळ काढून स्वत:ची काळजी घेणे हे म्हणजे या कलाकारांसाठी तारेवरची कसरत असते. या सगळ्या धावपळीच्या आयुष्यात तुमची लाडकी सरस्वती तिचा लहानपणापासूनचा छंद मालिकेच्या सेटवरच जोपासते आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हो, हे खरे आहे तिला चित्रकला या विषयाची आवड असून ती सेटवर अनेकवेळा चित्र काढत असते.तितिक्षाला लहानपणापासूनच चित्रकला खूप आवडते. पण, कधीच कुठल्याही चित्रकला स्पर्धेत वा चित्रकलेच्या क्लासला ती गेली नसल्याचे ती आवर्जून सांगते. तिला चित्रकलांच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यात कधी रसदेखील नव्हता असे ती सांगते. केवळ आवड म्हणून ती चित्र काढते. निवांत बसून मग्न होऊन चित्र काढणे हा तिचा आवडता छंद आहे. स्पर्धेत सांगितलेल्या वेळेत चित्र पूर्ण करणे तिला कधीच जमले नसते. त्यामुळेच ती नेहमी स्पर्धांपासून दूर राहिली.सरस्वती या मालिकेच्या सेटवर येताना देखील तिच्या सोबत तिचे कलर्स, चित्रकलेची वही सोबत असते. तिला चित्रीकरणाच्या वेळी जसा वेळ मिळतो, तसे ती चित्र काढते. आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर वेळात वेळ काढून ही आवड जोपासली पाहिजे ही गोष्ट तितिक्षा कटाक्षाने पाळते असे म्हणायला हरकत नाही. वॉटर कलर्स, क्रेओन्स, ब्रश असे बरेच काही कलेक्शन तितिक्षाकडे आहे. तिने आजवर काढलेल्या सगळ्या चित्रांमध्ये विठ्ठलाचे चित्र हे तिच्या सगळ्यात जवळचे आणि आवडते चित्र असल्याचे ती सांगते. तिने हे चित्र आषाढी एकादशी निमित्ताने काढले होते. तिचा जन्म हा आषाढी एकादशीचा असल्याने तिला हा महिना, विठ्ठल यांच्याविषयी खास प्रेम असल्याचे ती सांगते.  Also Read : सरस्वती फेम ​तितिक्षा तावडे झळकणार मराठी चित्रपटात