सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, ११ ऑगस्ट रोजी भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याचे आदेश दिले, तिथे त्यांना लस दिली जाईल. न्यायालयाच्या या आदेशाला अनेकांकडून कडाडून विरोध होत आहे. कुत्र्यांना हटवण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यावर देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे. अभिनेत्री रूपाली गांगुलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध दर्शवला. पण, रूपालीनं पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनी तिच्यावर बीफ आणि चिकन खाल्ल्याचे आरोप केलेत. या आरोपांवर रुपालीने संबधित नेटकऱ्याला प्रत्युत्तर दिले आहे.
रूपाली गांगुलीनं X वर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केली. ज्यात तिनं "भटके कुत्रे परके नाहीत ते आपल्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि सुरक्षेचा भाग आहेत. त्यांची काळजी घ्या, लसीकरण करा, अन्न द्या आणि त्यांना जिथे ते आहेत तिथेच जगू द्या", असं म्हटलं. तिच्या या पोस्टवर एका नेटकऱ्यांनं तिला भटक्या कुत्र्यांचा अजिबात वकिली करू नये असं म्हटलं. त्या युजरनं तिच्यावर चिकन, मटण, बीफ आणि मासे खाण्याचा आरोपही केला. तसेच तिला रेबीजग्रस्त कुटुंबांना भेटण्याचा सल्लाही दिला.
या पोस्टला उत्तर देताना रूपालीनं लिहिलं की, 'मी दररोज बेघर प्राण्यांना खायला घालते. मी ज्या प्राण्यांना खायला घालते, त्या सर्व प्राण्यांना नियमितपणे लसीकरण आणि निर्जंतुकीकरण केले जाते. मी निवारा गृहे आणि गोशाळांना समर्थन करते. माझ्या शहरातच नाही तर संपूर्ण भारतात.. मी शाकाहारी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे", असं म्हणत तिनं मासांहारी असल्याचा आरोप फेटाळला.
पुढे ती म्हणाली, "माझ्या घरी एकही उच्च जातीचा कुत्रा नाही, त्याऐवजी माझ्याकडे ४ भारतीय कुत्रे आहेत. माझा मुलगा लहानपणापासून तथाकथित भटक्या प्राण्यांसोबत राहिला आहे आणि एखाद्या अनोळखी प्राण्यानेही त्याचे संरक्षण केले आहे. त्यांना प्रेम आणि दया समजते, जे माणसांना समजत नाही. ही पृथ्वी सगळ्यांची आहे".