Join us  

'एमटीव्ही रोडीज' मुळे माझा संसार मोडला; रघु रामने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 1:16 PM

Raghu ram: रघु रामने दिलेल्या मुलाखतीमध्ये तो या शो ला कंटाळला होता असाही खुलासा त्याने केला आहे.

छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय असलेला रिअॅलिटी शो म्हणजे 'एमटीव्ही रोडीज'. या शोची तरुणाईमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळते. हा शो सुरु झाल्यानंतर रघु राम आणि राजीव लक्ष्मण या जोडीने जवळपास १० वर्ष त्याच्या परिक्षक पदाची भूमिका पार पाडली. मात्र, या शोमुळे माझा संसार उद्धवस्त झाला असा गौप्यस्फोट रघु राम याने केला. त्याच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळाल्या आहेत.अलिकडेच रघु रामने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या घटस्फोटाला रोडीज हा शो जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर या शोमध्ये झालेल्या क्रिएटिव्ह बदलांमुळेही त्याला त्रास झाल्याचं त्याने सांगितलं.

नेमकं काय म्हणाला रघु राम?"मी या शोला वैतागलो होतो त्याला दोन कारणं होतं. एक तर हा शो एमटीव्हीला एका विशिष्ट पद्धतीने करायचा होता, जे मला मान्य नव्हतं. या शोच्या १० पर्वांपर्यंत मला हवा तसा मी तो शो चालवू शकत होतो. पण नवव्या आणि दहाव्या पर्वाच्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझ्यात आणि एमटीव्हीमध्ये मतभेद निर्माण होतायेत. कारण, त्यांना या शोमध्ये एक विशिष्ट अँगल हवा होता", असं रघु राम म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "या शोला कंटाळण्याचं दुसरं कारण म्हणजे माझ्या वैवाहिक आयुष्यावर त्याचा परिणाम होत होता. मला मानसिक त्रासही झाला. रोडीजमुळे आणि लोकांच्या क्रेझमुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप उलथापालथ सुरु झाली होती. माझ्या लग्नावर त्याचा खूप परिणाम झाला आणि शेवटी माझा घटस्फोट झाला. त्यामुळे मी तिथेच थांबायचा निर्णय घेतला आणि हा शो सोडला. हा शो सोडल्याचा मला कधीच पश्चाताप झाला नाही."

दरम्यान, रघु रामने अभिनेत्री सुगंधा गर्गसोबत लग्न केलं. मात्र, २०१६ मध्ये ते विभक्त झाले. रघु रामने हा शो सोडल्यानंतर त्याला पुन्हा या शोसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्याने हा शो पुन्हा करण्यास नकार दिला. रघु आणि राजीव यांनी हा शो सोडल्यानंतर रणविजय सिंहने हा शो पुढे नेला. परंतु, २ वर्षापूर्वी त्यानेही हा शो सोडला. रोडीजच्या शेवटच्या सीझनमध्ये प्रिन्स नरुला, रिया चक्रवर्ती आणि गौतम गुलाटी हे जज म्हणून दिसले होते.

टॅग्स :रघु रामटेलिव्हिजनटिव्ही कलाकारएमटीव्ही