Join us

"सूनबाई अजूनही तुम्हाला पुरुन उरत आहेत...", विलासरावांचं पत्र वाचताच रितेशला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 10:54 IST

वडिलांचं पत्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख; रितेश देशमुख भावुक झाला

दिवंगत नेते विलासराव देशमुख हे जनमानसातील नेते होते. मुख्यमंत्री असतानाही ते प्रत्येकाला आपले वाटायचे असा त्यांचा स्वभाव होता. त्यांचा धाकटा मुलगा आणि महाराष्ट्रातील जनतेचा लाडका अभिनेता रितेश देशमुख त्यांच्या फार जवळ होता. आजही अनेक ठिकाणी रितेश वडिलांची आठवण काढली की भावुक होतो. नुकतंच एका कार्यक्रमात रितेशसमोर अभिनेता जितेंद्र जोशी ने विलासरावांचं पत्र वाचून दाखवलं. ते ऐकताना रितेशला अश्रू अनावर झाले.

एका पुरस्कार सोहळ्यात स्टेजवर जितेंद्र जोशी पत्र घेऊन येतो. रितेश देशमुखही स्टेजवर उभा असतो. जितेंद्र पत्र वाचायला सुरुवात करतो. 'सप्रेम नमस्कार विनंती विशेष, पत्रास कारण की या पत्रास काहीही कारण नाही. बापाला मुलाशी बोलायला कधीपासून कारणांची गरज भासायला लागली. आमचा दांडगा जनसंपर्क तर तुम्हाला माहीतच आहे. त्यांच्याबरोबर तुमचा पहिला मराठी चित्रपट पाहताना खूप भरून आलं. तुमचा ‘माऊली’  सिनेमा पाहून तर अभिमान वाटत होता. तुमचं दिग्दर्शक म्हणून पहिलं ‘वेड’ अनुभवलं अन् खात्री पटली तुम्ही यापुढे अशीच आनंदी अनुभूती आम्हाला आणि प्रेक्षकांना देत राहाल. 'तुझे मेरी कसम’चा आमचा समज तुम्ही 'वेड'मध्ये खोटा ठरवाल असं वाटलं होतं, पण नाही. सूनबाई अजूनही तुम्हाला  पुरून उरत आहेत."

"गंमत बाजूला. पण, रितेश तुम्ही वयानं आणि कर्तुत्वानं कितीही मोठे झालात तरीही आम्हाला दिसतो, तो भावंडांबरोबर बाभळगावच्या विहिरी पोहणारा, गुडघे फोडून सायकलची फेरी मारणारा, मातीत ढोपरं सोलवटून गोट्यांचा डाव जिंकणारा, क्रिकेटची बॅट खांद्यावर घेतलेला आमचा लहानगा चिमु. पण, आता तुम्ही अवघ्या भारताचं दैवत, आमची प्रेरणा राजाधिराज छत्रपती शिवरायांवर चित्रपट घेऊन येताय. परवाच्या तुमच्या लूक टेस्टला मी डोळे भरून पाहिलं आणि डोळे भरून आले" 

जितेंद्र जोशी पत्र वाचत असताना रितेशचेही डोळे भरुन येत होते. समोर बसलेले प्रेक्षकही भावुक झाले. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांना हा क्षण पाहता येणार आहे.

टॅग्स :रितेश देशमुखटेलिव्हिजनमराठी अभिनेता