Join us

'मला अश्लील गोष्टी करायला लावल्या'; रामानंद सागर यांच्या पणतीने केले Netflix शोच्या निर्मात्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 09:39 IST

Sakshi chopra: साक्षीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत Netflix च्या 'सोल प्रोडक्शन'मध्ये तिचं लैंगिक शोषण झाल्याचं म्हटलं आहे.

रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा (sakshi chopra) सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. साक्षीने Netflix शोच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. साक्षीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत घडलेला प्रसंग सांगितला आहे. Netflix शोच्या निर्मात्यांनी साक्षीला एका अश्लील गोष्टीमध्ये सहभाग घेण्यास सांगितलं. यात तिला अनोळखली व्यक्तींसोबत डान्स करण्यास, त्यांना अश्लील हावभाव करुन दाखवण्यास आणि रस्त्यावरील अनोळखी लोकांच्या पाठीला अश्लील स्पर्श करणे यांसारख्या गोष्टी करायला लावल्याचं तिने म्हटलं आहे. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

साक्षीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत Netflix च्या 'सोल प्रोडक्शन'मध्ये तिचं लैंगिक शोषण झाल्याचं म्हटलं आहे. ''त्या लोकांना वाटलं, त्यांनी सांगितलेल्या घाणेरड्या गोष्टींमध्ये मी सहभागी होईन. पण, तसं काही झालं नाही. इतकंच नाही तर कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरलेल्या गोष्टींप्रमाणेच त्यांनी काही केलं नाही. प्रत्यक्षात त्यांनी मला वेगळ्याच गोष्टी करायला सांगितल्या. कॉन्ट्रॅक्टनुसार, मला दररोज माझ्या आईसोबत दिवसातून एकदा बोलण्याची परवानगी होती. परंतु, सेटवर गेल्यानंतर मी काही खटकलेल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला. तर, त्यांनी माझ्याकडून माझा फोन हिसकावून घेतला. तसंच काही गोष्टी माझ्या मनाविरुद्ध माझ्याकडून करुन घेण्याचा प्रयत्न केला. हा केवळ एक गेम शो आहे असं मला सांगण्यात आलं. ज्यात गाणी, कंटेन्ट मेकिंग यासारखे एन्टरटेनिंग टास्क असतील. यात, गॉसिप, ड्रामा असं काही नसेल असंही सांगण्यात आलं होतं", असं साक्षी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी हे कॉन्ट्रॅक्ट फक्त एकाच गोष्टीमुळे साईन केलं होतं कारण, यात लिहिलं होतं की मी माझ्या आईसोबत रोज फोनवर बोलेन. नेटफ्लिक्सने जवळपास १ वर्षापेक्षा जास्त काळ मला त्रास दिला आहे. मी या शो साठी नकारच देत होते. मात्र, त्यांनी सातत्याने मला फोन, मेसेज केले. त्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल असं आश्वासन त्यांनी मला दिलं होतं. पण, प्रत्यक्षात माझी दिशाभूल करण्यात आली."

दरम्यान, साक्षीने सेक्शुअल हरॅसमेंट असं कॅप्शन देत ही पोस्ट शेअर केली आहे. सोबतच प्रचंड मानसिक त्रास दिल्याचंही तिने म्हटलं आहे. हा शो सध्या नेटफ्लिक्स इंडियावर प्रसारित होत आहे. ज्यात पार्थ समथान, मृदुल मधोक आणि रुही सिंग यासारखे स्पर्धक सहभागी झाले आहेत. साक्षीने केलेल्या आरोपांवर नेटफ्लिक्सने कोणतंही स्पष्टीकरण वा त्यांची बाजू मांडलेली नाही. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी