Join us

​राजेश्वरी सचदेव घेणार अनुजा साठेची जागा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 17:06 IST

अनुजा साठेने मराठी मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अग्निहोत्र, मांडला दोन घडीचा डाव यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले ...

अनुजा साठेने मराठी मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अग्निहोत्र, मांडला दोन घडीचा डाव यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले होते. तिने कॉफी आणि बरेच काही, राखणदार यांसारख्या मराठी चित्रपटातदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण बाजीराव मस्तानी या चित्रपटामुळे अनुजाच्या करियरला खऱ्या अर्थाने वळण मिळाले. अनुजाने या चित्रपटात भिऊभाई ही व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. या चित्रपटानंतर ती तमन्ना या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली. सध्या ती पेशवा बाजीराव या मालिकेत राधाबाईंच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत  आहे. राधाबाईंच्या भूमिकेला ती योग्य न्याय देत असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.बाजीराव पेशवेच्या आयुष्यावर आधारित असलेला बाजीराव मस्तानी हा चित्रपट प्रचंड गाजल्यामुळे त्यांच्या आयुष्यावर पेशवा बाजीराव ही मालिका बनवण्यात आली. या मालिकेत अनुजा राधाबाईंच्या भूमिकेत दिसत आहे. बाजीरावांना घडवण्यात राधाबाईंचा मोठा हात आहे. त्यामुळे ही भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जाते. पेशवा बाजीराव ही मालिका लवकरच लीप घेणार असून या मालिकेत तरुण वयातील बाजीरावांच्या कथा पाहायला मिळणार आहे. आता बाजीराव पेशवे यांची भूमिका करण सूचक साकारणार आहे. त्यामुळे करणच्या आईच्या भूमिकेत प्रेक्षकांना अनुजाला पाहायला मिळणार होते. पण अनुजा ही वयाने लहान असल्याने ती या भूमिकेत योग्य दिसणार नाही असे मालिकेच्या टीमचे म्हणणे असल्याने अनुजाची जागा राजेश्वरी सचदेव साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. लीपनंतर अनुजा प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे.