रस्त्यावरचे भटके कुत्रे अनेकदा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरतात. अनेकांना या भटक्या कुत्र्यांमुळे जीवही गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. तसेच रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला प्राणीप्रेमी आणि काही सेलिब्रिटींचा विरोध आहे. मात्र त्यांच्यावर आता राहुल वैद्य भडकला आहे.
राहुल वैद्यने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत त्याच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला सपोर्ट केला आहे. "सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. मलाही कुत्रे आवडतात. पण, गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे भटकणारे कुत्रे हे करुणा नव्हे तर समाजाची उपेक्षा दर्शवतात", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुढे राहुलने आणखी एक फोटो शेअर केला आहे. एका अभिनेत्याच्या कुत्राने राहुल वैद्यचा चावा घेतला होता. याचा फोटो शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे.
तो म्हणतो, "२०२१ मध्ये एका भटक्या कुत्र्याने माझा चावा घेतला होता. हा एका अभिनेत्याचा कुत्रा होता. हा रस्त्यावरचा कुत्रा होता जो त्याने पाळला होता. जेव्हा मी त्या सोसायटीमधल्या छोट्या मुलांशी बोललो तेव्हा मला कळलं की हा कुत्रा अनेकांना चावला आहे. आणि गंमत म्हणजे तो अभिनेता क्राइम पेट्रोल होस्ट करतो. जर तुम्हाला कुत्र्यांवर एवढंच प्रेम असेल तर त्यांना तुमच्या घरी घेऊन जा. फक्त सोशल मीडियावर स्टोरी टाकून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका करू नका. प्राण्यांवर प्रेम असणं आणि याचा काही संबंध नाही".
"शेवटचं म्हणजे जर तुमच्या पालकांना किंवा मुलांना रस्त्यावरचा भटका कुत्रा चावला असता तर तुमचं मत हेच राहिलं असतं का?" असा सवाल राहुलने त्याच्या पोस्टमधून विचारला आहे.