Join us  

तीन मराठमोळ्या अभिनेत्रींची एकाच हिंदी मालिकेत वर्णी, 'पुकार' मध्ये साकारणार महत्वाच्या भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 7:25 PM

सुमुखी पेंडसे, सुखदा खांडकेकर आणि सायली साळुंखे या मराठमोळ्या अभिनेत्री एकाच हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच ‘पुकार – दिल से दिल तक’ (Pukaar: Dil se dil tak) ही मालिका सुरु होत आहे. विशेष म्हणजे या हिंदी मालिकेत तीन मराठमोळ्या अभिनेत्री  मुख्य भूमिका साकारणार आहेत. सुमुखी पेंडसे, सुखदा खांडकेकर आणि सायली साळुंखे या मराठमोळ्या अभिनेत्रींची मालिकेत वर्णी लागली आहे.  काही दिवसांपासून मालिकेचा प्रोमो व्हायरल होतोय.

अभिनेत्री सुमुखी पेंडसे (Sumukhi Pendse) गेल्या ३० वर्षांपासून मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत काम करत आहेत. नुकतंच त्यांची 'लग्नाची बेडी' ही मराठी मालिका संपली. तर आता त्या 'पुकार' या हिंदी मालिकेतराजेश्वरी महेश्वरी ही खलनायिका साकारणार आहेत. तर अभिषेक निगम त्यांच्या नातवाच्या भूमिकेत आहे. बिझनेस आणि केवळ बिझनेसच माहित असणाऱ्या महिलेची ही भूमिका आहे. 

तर दुसरीकडे मराठमोळी सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar) मालिकेत सरस्वती ही व्यक्तिरेखा साकारत आहे.  अतिशय साधी आणि वेळप्रसंगी कठोर अशी तिची व्यक्तिरेखा आहे. तिच्या दोन मुलींची तिच्यापासून ताटातूट होते. त्या पुन्हा तिला कधी आणि कशा भेटणार याचीच ही कहाणी असणार आहे. सुखदा खांडकेकरने यात तिच्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. 

तर तिसरी अभिनेत्री आहे सायली साळुंखे (Sayli Salunkhe). सायलीने मराठीतील गाजलेली मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'छत्रीवाली' मध्ये दिसली. नंतर तिने हिंदी कलाविश्वात पदार्पण केलं. काही हिंदी मालिकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या. आता ती 'पुकार' मध्ये वेदिका ही भूमिका साकारत आहे. यात ती वकील आहे. 

२७ मे पासून सोनी टेलिव्हिजनवर रात्री ८.३० वाजता मालिका प्रसारित होणार आहे. तीन मराठमोळ्या अभिनेत्री एकाच मालिकेत मुख्य भूमिकेत असल्याने मराठी प्रेक्षकांचंही लक्ष लागलं आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतासुखदा खांडकेकरसेलिब्रिटीहिंदी