Join us

​जुही चावला झळकणार या कार्यक्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 15:41 IST

जुही चावलाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कयामत से कयामत, हम है राही प्यार के, डर हे तिचे ...

जुही चावलाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कयामत से कयामत, हम है राही प्यार के, डर हे तिचे चित्रपट तर प्रचंड गाजले आहेत. गुलाबी गँग या चित्रपटात ती काही वर्षांपूर्वी माधुरी दिक्षीत सोबत झळकली होती. या चित्रपटात जुहीचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटात तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. जुहीने मोठ्या पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यावरही तिची जादू पसरवली आहे. झलक दिखला जा या कार्यक्रमात तिने काही वर्षांपूर्वी परीक्षकाची भूमिका बजावली होती आणि प्रेक्षकांना ती परीक्षकाच्या भूमिकेतही आवडली होती. आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. ती आता छोट्या पडद्यावर कोणत्याही कार्यक्रमाचे परीक्षण करणार नाही तर ती एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.इपिक या वाहिनीवर लवकरच एक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचे नाव शरणम असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना भारतातील विविध तीर्थस्थळं पाहायला मिळणार आहे आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुसरे कोणीही नाही तर बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री जुही चावला करणार आहे. जुहीने या कार्यक्रमाच्या प्रोमोसाठी नुकतेच चित्रीकरण केले आहे. पण जुहीच्या फॅन्सना तिला या कार्यक्रमात पाहाता येणार नाही. या कार्यक्रमाला केवळ तिचा आवाज लाभला आहे. जुहीच्या आवाजाचे नेहमीच कौतुक केले जाते. तिच्या आवाजात एक जादू असल्याचे म्हटले जाते आणि त्यामुळेच या कार्यक्रमाला आवाज देण्यासाठी तिची निवड करण्यात आली असल्याची चर्चा आहे. भारतात आज अनेक तीर्थस्थळे आहेत. पण काही तीर्थस्थळांविषयी लोकांना तितकीशी माहिती नाहीये. लोकांना माहीत नसलेल्या तीर्थस्थळांविषयी या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना माहिती दिली जाणार आहे. हा कार्यक्रम काही ठरावीक भागांचाच असणार आहे. आठवड्यातून एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाचे २०-२५ भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. जुही चावला या कार्यक्रमाचा भाग होणार याची चर्चा मीडियात सुरू झाल्यापासून जुहीच्या फॅन्सना या कार्यक्रमाची चांगलीच उत्सुकता लागली आहे. Also Read : ​तर 'या' कारणामुळे 'कयामत से कयामत तक' चित्रपट रिलीज होण्याआधी घाबरली होती जुही चावला !