Join us  

प्रसाद ओकने दिली हास्यजत्रेच्या टीमला पार्टी, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट; म्हणाले, "CHYD बंद झालं म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:43 AM

"ऐका हो ऐका…अखेर हास्यजत्रा टीमला पार्टी दिलेली आहे", प्रसाद ओकची पोस्ट

"तुमच्या टेन्शनवरची मात्रा..." असं म्हणत प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. या शोमधील विनोदवीर अफलातून विनोदबुद्धी आणि अभिनयाची सांगड घालत प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतात. टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय आणि घराघरात पाहिला जाणारा असा हा शो आहे. हास्यजत्रेतील कलाकारांनाही प्रेक्षकांचं तितकंच प्रेम मिळतं. हास्यजत्रेबरोबरच प्रसाद ओक आणि त्याची पार्टी हादेखील चर्चेचा विषय असतो. अनेकदा स्किटमध्ये कलाकार यावरुन विनोदाचे पंच घेतात. पण, आता खरंच प्रसाद ओकने हास्यजत्रेच्या कलाकारांना पार्टी दिली आहे. 

प्रसादने त्याच्या नवीन घरी हास्यजत्रेच्या मंडळींसोबत जंगी पार्टी केली आहे. याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत प्रसाद म्हणतो, "ऐका हो ऐका…अखेर हास्यजत्रा टीमला पार्टी दिलेली आहे… समस्त रसिकांनी या घटनेची नोंद घ्यावी…!!! मंडळ आभारी आहे…!!!". त्याच्या या पोस्टवर हास्यजत्रेच्या कलाकारांनी कमेंट करत प्रसाद आणि मंजिरीचे आभार मानले आहेत. पण, नेटकऱ्यांनीही कमेंट करण्याची संधी सोडलेली नाही. प्रसादच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. 

"सेलिब्रेशनचं कारण : चला हवा येऊ द्या बंद झालं", असं म्हणत एकाने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर दुसऱ्याने "कशाला दिलीत पार्टी समीर दादाच्या स्किट मधला एक पंच कमी झाला," अशी कमेंट केली आहे. "फरसाण होते का पार्टीत", "समीर चौगुले be like - आज आनंद गगनात मावेना", "गौरव मोरे be like अरे बाबा,आता मरतो की काय?", अशा मजेशीर कमेंट केल्या आहेत. "ओंकार भोजने राहिला", असंदेखील एकाने म्हटलं आहे.

केवळ महाराष्ट्रातच नाहीतर परदेशातही हास्यजत्रेचे चाहते आहेत. नुकतंच हास्यजत्रेचे कलाकार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते. तिथेदेखील हास्यजत्रेचे शो हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले.  

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारप्रसाद ओक