Join us  

'माझं वैयक्तिक आयुष्यच राहिलं नव्हतं तेव्हा'; 'जुळून येती..'च्या १० वर्षानंतर प्राजक्ताने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 8:48 AM

Prajakta mali: अलिकडेच प्राजक्ताने एका मुलाखतीमध्ये 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेविषयी काही आठवणी शेअर केल्या आहेत.

'जुळून येती रेशीमगाठी' (julun yete reshimgathi) या मालिकेच्या माध्यमातून १० वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (prajakta mali). १० वर्षांपूर्वीची प्राजक्ता आणि आताची प्राजक्ता यात जमीन-आसमानाचा फरक आहे. या इतक्या वर्षात तिच्या स्वत: मध्ये आणि खासकरुन तिच्या प्रोफेशनल लाइफमध्ये बरीच प्रगती झाली आहे. त्यामुळे आज लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेला नुकतीच १० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने तिने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

"या मालिकेमधील भूमिका समोर आल्यानंतर लगेच मी ती करायची ठरवली. कारण, यात सासू-सुनेमधलं भांडण नव्हतं. आणि, खूप सकारात्मक पद्धतीने जाणारी सगळी पात्र होती. त्यामुळे मला यातली मेघना साकारावीशी वाटली. दोन वर्ष मी मेघना म्हणून जगले. मला असं माझं वैयक्तिक आयुष्यंच नव्हतं तेव्हा. ब्रेक घ्यायचे ते सुद्धा फक्त भरतनाट्यम क्लासेससाठीच. त्यानंतर पुन्हा शूटवर मेघना नेहमीच माझ्या आयुष्याचा भाग असेल, मी तिच्याबद्दल विचार करेनच, इतकंच नाही तर तिच्या दृष्टीकोनातून तो विचार करेन", असं प्राजक्ता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी प्रचंड रडले. इतकंच नाही तर जवळपास १५ दिवस रडत होते. शेवटचे काही दिवस माझ्यासाठी खूप अवघड होते. त्या भूमिकेत मी इतकी समरसून गेले होते की त्यानंतर मी १५ दिवस रडत होते. मी सुन्न होते."

दरम्यान, ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजली. मालिकेत प्राजक्तासोबत ललित प्रभाकर, मधुगंधा कुलकर्णी, सुकन्या कुलकर्णी, उदय टिकेकर, शर्मिष्ठा राऊत, सायली देवधर या कलाकारांनी स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या मालिकेची लोकप्रियता इतकी होती की प्रेक्षक आजही या मालिकेचा दुसरा भाग कधी येणार असा प्रश्न विचारतात.

टॅग्स :प्राजक्ता माळीटेलिव्हिजनललित प्रभाकरसुकन्या कुलकर्णीउदय टिकेकर