‘पिया अलबेला’ मालिकेला झाले एक वर्षं पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 11:19 IST
‘झी टीव्ही’वरील ‘पिया अलबेला’ मालिकेचे कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवत असून कथानकातील अनपेक्षित वळणांनी प्रेक्षकांमधील उत्कंठा वाढत चालली आहे. या ...
‘पिया अलबेला’ मालिकेला झाले एक वर्षं पूर्ण
‘झी टीव्ही’वरील ‘पिया अलबेला’ मालिकेचे कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवत असून कथानकातील अनपेक्षित वळणांनी प्रेक्षकांमधील उत्कंठा वाढत चालली आहे. या मालिकेने अलीकडेच प्रसारणाचा एक वर्षाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला असून मालिकेत पूजा या नायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री शीन दास हिने मालिकेच्या चित्रीकरणाच्या आठवणी जाग्या केल्या.शीन दासचे मालिकेतील पारुल चौधरी (नीलिमा व्यास) या आपल्या सहकलाकाराशी आता सलोख्याचे संबंध निर्माण झाले असले, तरी सुरुवातीला त्यांच्यात इतके जवळचे नाते नव्हते. यासंदर्भात शीन दास सांगते, “पारुल आणि मी एकाच खोलीत कशी राहू, असा प्रश्न मला सुरुवातीला पडला होता. पण जसजशी मला तिची ओळख होत गेली, तसतशी ती किती चांगली व्यक्ती आहे, हे माझ्या लक्षात येऊ लागले. आता आमच्यात घट्ट नाते निर्माण झाले असून ती चित्रीकरणाच्यावेळी नसली तर मी तिला खूप मिस करते.”मालिकेतील तिचा नायक असलेल्या अक्षय म्हात्रेबरोबर तिची मैत्री कशी वाढत गेली, तेही शीनने सांगितले. ती सांगते, “अक्षयची ओळख होण्यास मला जरा वेळ लागला. कारण सुरुवातीला तो चित्रीकरणात इतका व्यग्र असायचा की, कोणाशी तितकासा बोलायचा नाही. तो सेटवर असला, की अगदी व्यावसायिक अभिनेत्याप्रमाणे वागायचा. पण मधल्या मोकळ्या वेळेत आणि सेटबाहेर तो एक मस्त धमाल करणारा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर वेळ घालविताना खूपच मजा येते. आपल्या कामाबद्दल तो खूपच गंभीर आणि प्रामाणिक असून हे गुण मी त्याच्याकडून शिकले आहे. या मालिकेमुळे अंकित (राहुल व्यास), पारुल चौधरी (नीलिमा व्यास) आणि अक्षय म्हात्रे (नरेन) यांसारखे खूप चांगले फ्रेंड्स मला मिळाले आहेत.”गेल्या वर्षभरात प्रेक्षकांना पूजाच्या (शीन दास) व्यक्तिरेखेच्या विविध छटा आणि पैलू पाहता आले. आपल्या जादुई अभिनयाने आणि भूमिकेबद्दल असलेल्या समर्पित भावनेने तिने प्रेक्षकांची मने जिंकली असून तिचा स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आपल्या या प्रवासाबद्दल शीन दास सांगते, “पिया अलबेलामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला असून माझी टीम, माझे सहकारी, मालिकेचे कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे दिग्दर्शक यांची मी ऋणी आहे. पूजा व्यासच्या व्यक्तिरेखेच्या विविध पैलूंमधून मला खूप काही शिकायला मिळाले आहे, ते मी कधीच विसरणार नाही. पिया अलबेला ही माझी आजवरची सर्वात मोठी यशस्वी कामगिरी असून या मालिकेचा मला अतिशय अभिमान वाटतो.”Also Read : पिया अलबेलामधील नरेन आणि पूजाच्या नात्याला मिळणार वळण