जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या २६ जणांमध्ये भारतीय नौदलाचे अधिकारी विनय नरवालही होते. शहीद विनय नरवाल यांच्या मृतदेहाजवळ बसलेली त्यांची पत्नी हिमांशी यांचा काश्मीरमधील फोटो पाहून संपूर्ण देश हळहळला. विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी ही बिग बॉस ओटीटी फेम एल्विश यादवची मैत्रीण असल्याचा खुलासा नुकतंच युट्यूबरने केला आहे.
एल्विशने त्याच्या युट्यूवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो म्हणतो, "सोशल मीडियावर मी विनय नरवाल यांच्या पत्नीचा व्हिडिओ पाहिला होता. ज्यात ती सांगत होती की आम्ही इथे पाणीपुरी खात होतो. मी सुरुवातीला तो व्हिडिओ एवढ्या बारकाईने पाहिला नव्हता. त्यानंतर मी जेव्हा लक्ष देऊन पाहिलं तेव्हा मला वाटलं की मी हिला कुठेतरी पाहिलं आहे. त्यानंतर मला आठवलं की ही माझी क्लासमेट होती. हंसराज कॉलेजमध्ये आम्ही एकत्र शिक्षण घेत होतो. ती इकोनॉमिक्स शिकत होती. ते बघून मला धक्का बसला. मी २०१८मध्ये शिक्षण पूर्ण केलं. आम्ही एकत्र मज्जा मस्ती करायचो".
"माझ्याकडे तिचा नंबरही आहे. पण, तिला फोन करायची माझी हिंमतच झाली नाही. मी माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीला फोन केला. तेव्हा तिने सांगितलं की हो ती हिमांशी आहे. त्या मैत्रिणीने हिमांशीला कॉल केला होता. ३० वेळा फोन केल्यानंतर तिने तिचा कॉल उचलला. आणि ती जोरजोरात रडायला लागली. तेव्हा हिमांशीने जे काही घडलं ते सगळं तिला सांगितलं. तिचं ६ दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. हे काय घडतंय आपल्या देशात...", असंही त्याने पुढे सांगितलं.
शहीद विनय नरवाल हे त्यांची पत्नी हिमांशीसोबत जम्मू-काश्मीरमध्ये हनिमूनसाठी गेले होते. १६ एप्रिलला त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर अवघ्या सातच दिवसांत विनय नरवाल यांची काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. ते मुळचे हरियाणाचे रहिवासी होते.